वडगाव मावळ (पुणे) : शेतात भातातील गवत काढताना शेतकऱ्याच्या अंगावर विद्युत वहिनी तुटून पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी 8:30 च्या सुमारास कांब्रे नामा (ता. मावळ जि. पुणे) येथे घडली. श्रीकांत गणपत गायकवाड याचा विजेच्या शॉक लागल्याने मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत गायकवाड हा नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात भातातील गवत काढत असताना, अंगावर विद्युत वाहिनी तुटून पडली. त्यामध्ये त्याचा विजेच्या शॉकने जागीच मृत्यू झाला. बाजूच्या शेतात काम करणाऱ्या व्यक्तीने ही माहिती त्याच्या कुटुंबाला दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. या घटनेने कांब्रे नामा तसेच नाणे मावळात शोककळा पसरली आहे. या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहे. श्रीकांत गायकवाड हा खाजगी कंपनीत चिंचवड येथे काम करत होता. शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याने शेतात कामाला गेला त्यांचा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मावळ तालुक्यातील विद्युत विभागाच्या गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. पावसाळ्यात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. धोकादायक विद्युत खांब, वीज वाहिन्या यांची वेळीच दुरुस्ती केली जात नाही. वारंवार जीवित व वित्त हानीच्या घटना वारंवार होत आहेत. धोकादायक विद्युत खांब व वीज वाहिन्या त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.