ओतूर (पुणे) : ओतूर येथील डॉ. कुटे हॉस्पिटलमध्ये अरविंद उल्हास गाढवे या ३१ वर्षीय तरुणाचे निधन झाल्याची घटना घडल्यानंतर नातेवाइकांनी याला डॉ. कुटे यांचा निष्काळजीपणा जबाबदार असून हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला व डॉ. समीर कुटे यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताच्या नातेवाइकांनी केली आहे.
अरविंद गाढवे मंगळवार रोजी हा घराच्या बाहेर अर्धवट बेशुद्धावस्थेत पडलेला होता. त्यानंतर त्याला नातेवाइकांनी तात्काळ डॉ. समीर कुटे यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करणेकामी दाखल केले होते. त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की, अरविंद हा औषध पिलेला असण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांनी अरविंद याचे रक्त सॅम्पल व इतर चाचण्या करून घेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्याचे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले की, रिपोर्ट नॉर्मल आहेत. त्याच्यावर आम्ही उपचार करतो. त्यानंतर त्यांनी अरविंद याच्यावर उपचार सुरू केले. त्यावेळी सर्जेराव गाढवे यांनी डॉक्टरांना विचारले की, पुढील उपचार करण्यासाठी पेशंटला दुसरे हॉस्पिटलमध्ये नेऊ का त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की परिस्थिती नियंत्रणात असून पेशंटच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याने त्याला दुसरीकडे पाठवण्याची आवश्यकता वाटत नाही, डॉक्टरांनी असे सांगितल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्याच ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू केले होते.
दिनांक ११ रोजी रात्री त्यावेळी आम्हाला पेशंट हा कोणतीही हालचाल करत नसल्याचे दिसून आले तसेच त्याचा ईसीजी व पल्स कार्डिओ हे काही दाखवत नव्हते. डॉक्टर आम्हाला त्याला पुढील उपचारकामी दुसरे दवाखान्यात घेऊन जाण्याचा आग्रह करत होते.