पुणे : ससून रुग्णालयातील तळमजल्यावरील ट्राॅमा अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाला उंदीर चावल्याप्रकरणाचा अहवाल वैदयकीय शिक्षण विभागाने मागवला आहे. त्या अहवालानुसार संबंधितावर कारवाई करण्याची शिफारस करणारा अहवाल राज्य सरकारला सादर केला असून चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाईची शिफारस करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुचाकी चालवताना पुलावरून पडल्याने वेल्ह्यातील 30 वर्षीय सागर रेणुसे या तरूणाला ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी 17 मार्च राेजी दाखल केले हाेते. त्या तरूणाला ट्रॉमा सेंटरमध्ये उंदीर चावल्याचा आराेप त्याच्या नातेवाईकांनी केला हाेता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वैदयकीय शिक्षण विभागाकडून समिती स्थापन करण्यात आली होती. तीन सदस्यीय समितीने ससून रुग्णालयाला भेट दिली आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) अहवाल सादर केला.
ससूनमधील सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार मृत रुग्णाच्या शरीरावर उंदराच्या चाव्याच्या खुणा हाेत्या. तसेच त्याचा उल्लेख शिफारस अहवालात देखील करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर शवविच्छेदन अहवालात देखील याचा उल्लेख करण्यात आला होता आणि तपासणीदरम्यान रुग्णालय प्रशासनाने त्यास सहमती दर्शविली होती. समितीच्या अहवालानंतर आता रुग्णालयामध्ये पेस्ट कंट्रोल करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीवर या संदर्भात कारवाई करण्याच्या शक्यता व्यक्त केली जात आहे.
यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला होता. तसेच रुग्णालय व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती . मृताच्या नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.
याबाबत वैदयकीय शिक्षण विभागाचे संचालक डाॅ. दिलीप म्हैसेकर यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की समितीने याबाबत तपासणी अहवाल सादर केला आहे. त्यातील निष्कर्षांनुसार ससून प्रशासनात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.