तळेगाव दाभाडे (पुणे) : तळेगाव स्टेशन येथील तळ्यात पोहण्यासाठी उतरलेल्या युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.५) सायंकाळी घडली. आरमान अंकीलूर रहिमान खान (वय १८, रा. कमलारमण नगर, बैगनवाडी गोवंडी, मुंबई) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी तळेगाव जनरल हॉस्पिटलचे सीएमओ डॉ. मुकुंद पोतदार यांनी येथील पोलिस ठाण्यात खबर दिली.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथील एमएसईबी कार्यालयाजवळील तळ्यामध्ये पोहण्याकरता काही युवक पाण्यात उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने आरमान अंकीलुर रहिमान खान पाण्यात बुडाला. त्यास तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दल, तळेगाव दाभाडे पोलिस व वन्यजीव रक्षक मावळ संस्था आपदा मित्र मावळ, पुणे तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
पुढील उपचारासाठी तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेश गुट्टे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भारत वारे करीत आहेत.