पुणे : स्विमिंग पुल मध्ये पोहत असताना एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना कात्रज परिसरात घडली होती. साहिल महेंद्र उके (वय- ३१, रा. कोंढवा) असे मृत झालेल्या युवकाचे नाव होते. याप्रकरणी स्विमींग पुलाचे व्यवस्थापक, कोच आणि लाईफगार्ड यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी साहिल याचे वडिल महेंद्र शंकर उके (वय- ५९ रा. भंडारा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कात्रज लेकटाऊन येथील शंकरराव राजाराम कदम स्वीमिंग पुल येथे २० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली होती. फिर्यादी यांचा मुलगा साहिल उके हा लेकटाऊन कात्रज येथील शंकरराव राजाराम कदम स्विमींग पुल येथे मागील तीन महिन्यापासून पोहण्याचे प्रशिक्षण घेत होता. २० एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास साहिल पोहण्यासाठी स्विमींग पूलमध्ये उतरला. मात्र, दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला होता.
घटना घडली त्यावेळी स्विमींग पूल परिसरात लाईफगार्ड तसेच कोच उपस्थित नव्हते. त्यामुळे साहिल याला वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. आरोपींच्या निष्काळजीपणामुळे व हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक झिने करत आहेत.