पुणे : मध्यरात्री दाेन वाजता नाल्याच्या कडेला लघुशंकेला जाणे तरुणाला चांगलेच महागात पडले. पाय घसरल्याने तरुण नाल्यात पडला. सुदैवाने तरुणाला पाेहायला येत हाेते. परंतु पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने तरुण नाल्याील एका कप्प्याजवळ अडकला. याबाबत अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
जवान पोहोचताच पाण्याचा प्रवाह पाहून त्यांना तातडीने निर्णय घेऊन त्या युवकाला जिवंत बाहेर काढण्याचे आव्हान समोर होते. परंतू, दलाचे जवानच येणार व मला सुखरुप बाहेर काढणार हा विश्वास त्या युवकाला ही होता. तातडीने अधिकारी समीर शेख यांनी निर्णय घेत जवान प्रकाश शेलार यांनी प्रवाहात उडी मारत सोबत रशी व बॅटरी घेत शोध सुरु केला. आतमधे पहिली फेरी मारत काहीच न मिळाल्याने शेलार बाहेर आले. जरा उसंत घेत परत डुबकी मारत शोध घेतला असता अडकलेला युवक शेलार यांच्या नजरेस पडला. युवकाने ही जवानाला पाहताच “फायरब्रिगेड येणार व मी वाचणार हे माहितच होत असे ही म्हणाला. क्षणाचा ही विलंब न करता युवकास रशी बांधून त्याला सुखरुप बाहेर आणले. युवक सुखरुप असून त्याला प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. युवकाची फक्त मानच पाण्याबाहेर होती व अशा परिस्थितीत तो फोनवरुन संपर्क करित होता.
या कामगिरीत दलाचे अधिकारी सुनिल गिलबिले, समीर शेख, चालक राजु शेलार, नवनाथ मांढरे तसेच जवान राजाराम केदारी, प्रकाश शेलार, छगन मोरे, मंगेश मिळवणे, योगेश चोरघे, सुनिल टेंगळे, हेमंत सातभाई यांनी सहभाग घेतला.