सोमेश्वरनगर : गडदरवाडी (ता. बारामती) येथील गणेश नामदेव लकडे (वय २५) हा युवक निरा नदीवरील निंबुत गावच्या हद्दीतील बंधाऱ्याच्या पुलावरून गुरुवारी (दि.२६) रोजी निरा नदीत वाहून गेला आहे. गणेश हा कामानिमित्त निंबुत येथील बंधाऱ्यावरुन पाडेगाव (ता. फलटण) येथे गेला होता. बंधाऱ्यावरुन जात असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो नदीपात्रात पडला. दिवसभर स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, तलाठी मधुकर खोमणे, ए. डी. होळकर, ग्रामसेवक सचिन लिंबरकर, पोलिस हवालदार महेंद्र फणसे, काशीनाथ नागराळे यांनी घटनास्थळी दिली. सध्या वीर धरणातून निरा नदीत जवळपास १४ हजार क्यूसेकने विसर्ग सुरु असल्याने शोध मोहिमेत अडथळा येत आहे. मुरुम, होळ आणि कोऱ्हाळे येथील स्थानिक नागरिकांना कळवून बंधाऱ्यात मृतदेह शोधण्याचे काम दिवसभर सुरु होते. रात्री उशिरापर्यंत गणेशचा शोध घेण्याचे काम सुरु होते. मात्र, यामध्ये यश आले नाही.ऑगस्ट महिन्यात निरा नदीला आलेल्या पुराने निंबुत बंधाऱ्यावरील संरक्षण लोखंडी जाळ्या आणि कठडे गायब झाले असून येथून धोकादायक पध्दतीने वाहतूक सुरु आहे. गेल्या वर्षीही येथील एक युवक नदीपात्रात पडून मृत्युमुखी झाला होता.
बारामती तालुक्यात गडदरवाडी येथील युवक पुराच्या पाण्यात वाहुन गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 1:39 PM
निरा नदीला आलेल्या पुराने निंबुत बंधाऱ्यावरील संरक्षण लोखंडी जाळ्या आणि कठडे गायब झाले असून येथून धोकादायक पध्दतीने वाहतूक सुरु आहे.
ठळक मुद्देनिंबुत बंधाऱ्यावरील संरक्षण लोखंडी जाळ्या आणि कठडे गायब सध्या वीर धरणातून निरा नदीत जवळपास १४ हजार क्यूसेकने विसर्ग सुरु