वालचंदनगर : कळंब (ता. इंदापूर) येथील रोहित चव्हाण या तरुणाने गावाचे व इंदापूर तालुक्याचे जगाच्या नकाशावर कोरले आहे. आंतरराष्ट्रीय फायर फायटर भालाफेक स्पर्धेत रोहितने सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला आहे.रोहितचे कळंब वालचंदनगरला फटाके वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आले. एका सामान्य मजूर कुटुंबात जन्माला आलेल्या रोहितने लहानपणापासूनच हालाखीच्या परिस्थितीचा सामना केला आहे. वडील गवंडीकाम करत होते. आई-वडील अशिक्षित आहेत. अनेकदा शाळा बुडवून वडिलांच्या हाताखाली बिगारी काम करण्यास जावे लागत होते. त्याचे शैक्षणिक नुकसान होत होते. नववीपासून अंथूर्णे येथे १२ वी पर्यंतचे शिक्षण घेत असताना त्याला भगवानराव भरणे पोलीस भरती प्रशिक्षण शिबिरातून खेळाची आवड निर्माण झाली. तसेच नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे उच्च शिक्षण घेत असताना त्याने शालेय स्तरावर राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. त्याने खेळाचा सराव सोडला नाही. सराव करत असतानाच आर्मी, पोलीस, नेव्ही दलात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. सुदैवाने सन २०१७ मध्ये त्यास मुंबई अग्निशामक दलात नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतरही रोहितने आपले ध्येय सोडले नाही. छोट्या भावाचे उच्च शिक्षणाच्या खर्चात हातभार लावत, आई-वडिलांना आर्थिक मदत करून वाचलेल्या पैशातून डाएट (प्रोटीन) घेण्यास सुरुवात केली.मुंबई येथील खासगी मैदानावर भाला फेकण्याचा सराव सुरू ठेवला आणि अग्निशामक दलाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यास अग्निशामक दलाने प्रोत्साहन दिले. त्यामुळे दक्षिण कोरिया येथे होत असलेल्या १३ व्या जागतिक फायर फायटर्स स्पर्धेकरिता त्याला पाठवण्यात आले होते. या स्पर्धेत त्याने ६८ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक मिळवले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय अग्निशामक दलाचा नावलौकिक उंचावला असून रोहितच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कळंब येथील तरुणाने रचला ‘सुवर्ण’ इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 2:11 AM