ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. 25 - येथील गणेशमहाराज नाणेकर या युवकावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी हातावर, पोटावर व डोक्यावर कोयता व सुऱ्याने वार करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी तीन अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळच असलेल्या गृहप्रकल्पाच्या रखवालदाराने व एका मुलाने आरडाओरडा केल्याने हत्यारे टाकून हल्लेखोर पसार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना शुक्रवारी ( दि. २४ ) रात्री सव्वा दहाच्या सुमारास पद्मालय प्रॉपर्टीजच्या समोरील संदीप महादू नाणेकर यांच्या शाळूच्या शेतात घडली. या हल्ल्यात येथील महाराज ग्रुपचे अध्यक्ष व बांधकाम उद्योजक गणेश संभाजी नाणेकर उर्फ गणेश महाराज ( वय ३१ वर्षे, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता.खेड, जि. पुणे ) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला प्रथम युनिकेअर हॉस्पिटल मध्ये प्राथमिक उपचार करून त्वरित चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नाणेकर यांच्यावर यशस्वीपणे शस्रक्रिया करण्यात आली असून अद्याप प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप समजले नाही. मात्र नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणूक किंवा व्यावसायिक वादातून हि घटना घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावरून एक कोयता व एक सुरा पोलिसांनी जप्त केला आहे. पद्मालय प्रॉपर्टीजचे सीसी टीव्ही कॅमेरे असूनही ते कुचकामी ठरले आहेत. मात्र हल्ल्यापूर्वी गणेश नाणेकर यांना मोबाईलवरून घरून बोलावून घेतल्याने आरोपींचा छडा लागणार आहे. हल्लेखोरांनी नाणेकर यांना रस्त्यावरून शेतात ओढून नेले व हातातील कोयता व सुऱ्याने सपासप वार केले.
याप्रकरणी पूनम गणेश नाणेकर ( वय २६, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता.खेड, जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार दत्ता जाधव, अजय भापकर, अनिल गोरड, अशोक साळुंके व ज्ञानेश्वर सातकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे अधिक तपास करीत आहेत.