काटेवाडी (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परखड आणि स्पष्ट स्वभावाने युवक वर्गात त्यांची मोठी लोकप्रियता आहे.आता ‘अजितदादा’ राज्याच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत, अशी सर्वांची इच्छा आहे. नेरूळ येथील एका युवकाने तुळजापूरच्या देवीला ‘दादां’च्या मुख्यमंत्रिपदासाठी साकडे घातले आहे. त्यासाठी त्याने कडाक्याच्या थंडीत नेरूळ ते तुळजापूरपर्यंत पदयात्रा काढली आहे. याबाबत काटेवाडीकरांनी त्याचे तोफांची सलामी देत स्वागत केले.
सागर पवार असे या युवकाचे नाव आहे. दि. १५ नोव्हेंबरपासून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सागर याने ही पदयात्रा सुरू केली आहे. याबाबत काटेवाडीकरांना माहिती मिळाली. त्यानंतर सर्वांनी त्याला त्याच्या पदयात्रेच्या मार्गावर इंदापूर येथे गाठले. यावेळी त्याचे फटाक्यांची आतषबाजी व तोफांची सलामी देत जोरदार स्वागत करण्यात आले.
लाडक्या नेत्याला चांगले पद मिळावे, याकरिता दिवसरात्र राबणारे कार्यकर्ते सर्वांनी पाहिलेत. मात्र आपला नेता मुख्यमंत्री व्हावा याकरिता शेकडो मैल पायी चालत जाणारा एक कार्यकर्ता आमच्यासाठी मोलाचा आहे. सागर यांनी ‘अजितदादा’ मुख्यमंत्री व्हावेत, असा देवीला नवस केला आहे. हा नवस पूर्ण होण्याकरिता नेरूळ ते तुळजापूर अशी पदयात्रा काढली आहे. दि.१५ नोव्हेंबरपासून सुरू झालेली पदयात्रा जवळपास १२ दिवस चालत गेल्यानंतर तुळजापूर येथे पोहचणार आहे. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी आई तुळजा भवानीच्या चरणी साकडे घालण्यात येणार आहे. अजितदादा खऱ्या अर्थाने विकासपुरुष आहेत. ते मुख्यमंत्री व्हावेत ही आम्हा काटेवाडी बारामतीकरांचीदेखील इच्छा आहे. त्यामुळे सागर यांच्या पदयात्रेला सलामी देण्यासाठी आम्ही गेलो होतो, असे काटेवाडीचे माजी सरपंच विद्याधर काटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.यावेळी काटे यांच्यासमवेत नूतन उपसरपंच मिलिंद काटे, सागर भिसे, विशाल सुतार, प्रकाश गाडे, प्रफुल्ल देवकर आदी युवक उपस्थित होते.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी आदर्श व्यक्ती असते. ज्याचे अनुकरण आपण करत असतो. अजित पवार हे आपले राजकीय आदर्श नेते आहेत. ते येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री व्हावेत यासाठी आई तुळजाभवानीला साकडे घालण्यासाठी पदयात्रा काढली आहे. त्यासाठी खुद्द ‘दादां’च्या गावकऱ्यांनी मला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मला ऊर्जा मिळाल्याचे सागर पवार यांनी सांगितले.