भिगवण : इंदापूर तालुक्यात वाळूमाफियांची पळताभुई थोडी करणारे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली झाल्यामुळे वाळूमाफियात उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वाळूमाफियांनी बोटीवरून फटाके वाजवीत जल्लोष व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाटील यांची बदली होण्यासाठी एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असतानाही तरी देखील कार्यकाळ संपण्यापूर्वी झालेल्या बदलीमागे कोणाचा हात आहे, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, या बदलीविरोधात स्थानिक तरुण एकवटले असून, बदली रद्द करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सवर त्यांनी मोहीम राबबिली आहे.
‘ना खाउंगा ना खाने दुंगा’ या म्हणीचा वापर करीत दोन वर्षे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी उजनीमधील वाळूमाफियांना जेरीस आणले होते. उजनीतील काळे सोन्याची आस असणाऱ्यांच्या अनेकांचे डोळे दिपवीत तहसीलदारांनी कारवाई सुरूच ठेवत लाखो रुपयांचे वाळू उपसा करणारी साधनसामग्री नष्ट केली. तालुक्यातील पोलीस ठाण्याबाहेर वाळूवाहतूक करणाºया गाड्या त्यांनी जप्त केल्या होत्या. त्यांची बदली झाल्याचा निरोप मिळताच वाळूमाफियांनी आनंद व्यक्त केला. मात्र, सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. बदलीला विरोध असल्याचे सांगत त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत बदली करू नये अशी मागणी केली आहे. तालुक्यातील १०० गावांतून तहसीलदार पाटील यांची बदली करू नये, अशी निवेदने मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना पाठविली जाणार आहेत.अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक तुषार झेंडे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना मेल करून तहसीलदार यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांच्या कार्यालयाने या मेलची दखल घेत पुढील कार्यवाहीसाठी प्रधान सचिव महसूल व वन विभाग मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती झेंडे पाटील यांनी दिली.साहेबांंची बदली रद्द करायचीच...तहसीलदार पाटील यांची बदली व्हावी यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या वाळूमाफिया आणि मुरूममाफियांच्या पाटील यांची बदली झाल्याने श्रावण महिन्यातच उजनी किनारी पार्ट्या रंगल्या. याबाबत परिसरात जोरदार चर्चा रंगली. तहसीलदार पाटील यांच्या मागे तालुक्यातील युवावर्गाने ताकद उभी केली आहे. ‘साहेबांची बदली रद्द करायचीच’ असा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. एकूणच तहसीलदारांच्या बदलीविरोधात जनमत उसळल्याने वाळूमाफिया मात्र धास्तावले आहेत.