- किरण शिंदे
पुणे : दुपारच्या सुमारास पायी चालत घरी निघालेल्या एका डॉक्टर महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी पळून जाणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक तरुणांनी पाठलाग करून पकडले. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुरुवार पेठेत मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणात चोरटा महेश उर्फ राहुल लक्ष्मण सावंत (वय 23) अटक करण्यात आली असून खडक पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका 29 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या डॉक्टर आहेत. गुरुवार पेठेतून त्या पायी जात असताना महेश सावंत या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि पळ काढला. दरम्यान चोरटा पळून जात असताना फिर्यादी यांनी आरडाओरडा केला आणि लोकांना मदत करण्याचे आवाहन केले. दरम्यान याचवेळी घोरपडी पेठेत काही तरुण क्रिकेट खेळत होते. महिलेच्या ओरडण्याने सतर्क झालेल्या या तरुणांनी पाठलाग करून या सोनसाखळी चोराला पकडले. काही वेळानंतर त्या ठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांच्या हवाली या चोरट्याला करण्यात आले.
दरम्यान प्रसंगावधान राखून पळून जाणाऱ्या या चोरट्याला धाडसाने पकडणारे स्थानिक तरुण गोवर्धन विलास गोगावले, हेमंत विनायक झेंडे, उमेश काशीद, अभिषेक दिगंबर जाधव यांनी दाखवलेल्या तत्परतेबाबत व धाडसाबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव आणि खडक पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या तरुणांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच या निमित्ताने नागरिकांनी देखील अशा प्रकारे धाडस दाखवून मदतीला पुढे यावे असे आवाहन देखील खडक पोलिसांनी केले.