पुणे : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकत्व संशाेधन विधेयकाला विराेध करण्यासाठी तरुणाई माेठ्याप्रमाणावर रस्त्यावर उतरली हाेती. पुण्यातील गुडलक चाैकामध्ये एकत्र येत निदर्शने करण्यात आली. यावेळी हा कायदा रद्द करावा अशी मागी यावेळी करण्यात आली. युक्रांत बराेबरच इतर सामाजिक संस्था या निदर्शनामध्ये सहभागी झाल्या हाेत्या.
नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत संमत झाल्यानंतर त्याला देशभरातून विराेध हाेताना दिसत आहे. देशातील विविध भागांमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरुन या कायद्याचा निषेध करत आहेत. दिल्लीतील जामिया मिलीया विद्यापीठात झालेल्या हिंसाचारानंतर या आंदाेलनाची व्याप्ती वाढली. देशभरातील विविध विद्यपीठांमध्ये तसेच रस्त्यावर या कायद्याचा निषेध करण्यात येत आहे. आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास पुण्यातील गुडलक चाैकामध्ये निदर्शने करण्यात आली. दाेन्ही कायद्यांना विराेध करणारे फलक यावेळी हातात धरण्यात आले हाेते. या आंदाेलनात तरुणांची संख्या सर्वाधिक हाेती.
यावेळी बाेलताना युक्रांतचे संदीप बर्वे म्हणाले, सीएए आणि एनआरसी या कायद्याला देशभरात विराेध केला जात आहे. आज युक्रांतच्यावतीने आम्ही आंदाेलन आयाेजित केले हाेते. या आंदाेलनात विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले हाेते. केंद्र सरकारने लाेकांच्या भावना लक्षात घेऊन हे दाेन्ही कायदे रद्द करावेत. परवा दिल्लीमध्ये हाेणाऱ्या नॅशनल काॅन्फरन्समध्ये देखील सहभागी हाेणार आहाेत. आम्ही शांततेत आंदाेलन करणार आहाेत. कुठलिही हिंसा करणार नाही. परंतु आम्ही कुठल्याही परिस्थितीत हे दाेन्ही कायदे लागू करु देणार नाही.
92 वर्षांच्या आजींनी घेतला सहभाग
आज गुडलक चाैकात सुरु असलेल्या आंदाेलनात एका 92 वर्षीय आजींंनी देखील सहभाग घेतला हाेता. त्यांना व्हिलचेअरवर आंदाेलनाच्या ठिकाणी आणण्यात आले हाेते. त्यांच्या सहभागाविषयी बाेलताना त्यांच्या सुष्ना डाॅ. शक्तीश्वरी म्हणाल्या, माझे सासरे हे स्वातंत्र्यसेनानी हाेते. त्यांनी ब्रिटीशांच्या विराेधात लढा उभारला. दुर्देवाने आज आपल्याला आपल्याच काही लाेकांच्या विराेधात लढा उभारावा लागत आहे. हे दाेन्ही कायदे देशात दुफळी निर्माण करण्याचे काम करीत आहेत. हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामुळे धर्माच्या नावाने देशाला विभागने याेग्य नाही. असेच पुढे चालू राहिले तर हे लाेक जातीच्या आधारे देशाचे विभाजन करतील.