राज्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे सगळीकडे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. वेळेत ऑक्सिजन मिळविण्यासाठी रुग्णालयांना मोठा आटापीटा करावा लागतो. ही बाब लक्षात घेत बारामती येथील ए. के. ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेड या बारामती एमआयडीसी कंपनी येथून अहमदनगर येथील जामखेड, कर्जत, पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर आदी परिसरातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरविण्याचे काम अहोरात्र केल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. अत्यंत बिकट परिस्थितीत सामाजिक भान ठेवून सुहास यांनी शिरूर तालुक्यासह अन्य तालुक्यात ऑक्सिजन पुरवठा चांगल्या प्रकारे केल्यामुळे त्यांचे या कामाबाबत कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार, शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार यांनी कौतुक केले आहे.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार म्हणाले की, जगभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट सध्या सुरू आहे. महाराष्ट्रात या लाटेमुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. अशा लाटेमध्ये काही नागरिकांना बारीक ताप येणे, थकवा जाणविणे, अंग दुखणे, पाय दुखणे, घसा दुखणे, असे काही लक्षणे जाणवू लागल्यानंतर कोणत्याही निष्काळजीपणा न करता तातडीने जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. तसेच मांडवगण फराटा, उरळगाव या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या कोरोना सेंटरमध्ये बाधितांनी दाखल होऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन पवार यांनी केले .मांडवगण फराटा येथील कोविड केअर सेंटरमध्ये आजपर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्ण 265 होते व त्यापैकी 169 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णतः बरे होऊन घरी परतले आहेत . त्यामुळे शिरूरच्या पूर्व भागातील सर्वसामान्यांना नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी अहोरात्र जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार यांनी प्रयत्न केला.
तसेच मांडवगण फराटा येथील कोविड केअर सेंटरमधून जे कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतलेल्या आहेत त्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या, माजी सभापती सुजाता पवार यांनी केले आहे.