देलवडी येथे मोलमजुरी करणाऱ्या बेलदार कुटुंबीयांच्या या शेळ्या होत्या. या कुटुंबाने आपल्या घरापासून २०० मीटर अंतरावर ५ शेळ्या गवत खाण्यासाठी बांधलेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास चालण्यासाठी आलेल्या प्रकाश शेलार, सागर भालेराव, विजय कुंभार व तेजस हनुमाने या युवकांना शेळ्यावरती रानटी कुत्री हल्ला करत असल्याचे निदर्शनास आले. बांधल्या असल्यामुळे शेळ्यांना पळता येणे अशक्य होते. क्षणाचाही विलंब न करता युवकांनी हातामध्ये दगड घेतले आणि रानटी कुत्र्यांच्या दिशेने भिरकावले. शेळ्यांना कुत्र्यांपासून बाजूला केले. तोपर्यंत दोन शेळ्यांचा लचके काढल्यामुळे जागीच मृत्यू पावल्या. प्रसंगावधान राखत युवकांनी शेजारील बेलदार कुटुंबीयांना हाका मारल्या व जखमी शेळ्यांना पाणी पाजले. पशुवैद्यकीय अधिकारी दीपाली क्षीरसागर, गणेश गुरव, तलाठी राजेंद्र फणसे, पशुवैद्य दत्तात्रय शिंदे, वनकर्मचारी माऊली आडागळे, सुरेश पवार यांच्याशी संपर्क साधला. तत्काळ प्रथमोपचार करत तीन शेळ्यांचा जीव वाचविण्यात यश आले. यामुळे युवकांचे परिसरात कौतुक होत आहे.
युवकांनी वाचला शेळ्यांचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:10 AM