बारामती: बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.पी. दरेकर यांनी जन्मठेपेसह १७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अनिल बबन बनकर (वय ३८, रा. टिळेकर वस्ती, पिलानवाडी, ता. दौंड )असे या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिलानवाडी ( ता. दौंड ) येथे १८ जून २०२० रोजी ही घटना घडली होती. पिडीतेची आई व कुटूंबीय पोल्ट्रीवर कामास होते. त्यावेळी पीडिता ६ वर्षांची होती. त्या दिवशी तिची आई भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेली होती, तर पीडिता व तिचे भाऊ-बहीण पोल्ट्रीजवळ खेळत होते. यावेळी आरोपीने तेथे येत पीडितेच्या बहीणीला बाहेर जाण्यास सांगितले. तसेच पीडितेला पोल्ट्रीत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास पोटात चाकू मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पिडीतेच्या आईने यवत पोलीस स्टेशन येथे दिली होती.
यवत पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वाघमोडे यांनी या प्रकरणी तपास करीत आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम (४,६,१०,१२ व भा.द.वि. कलम ३७६,५०४,५०६) प्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी ७ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फियार्दी म्हणजेच पिडीतेची आई ही न्यायालयात फितूर झाली होती. फिर्यादीच्या विसंगत जबाब न्यायालयात दिला. परंतू पिडीता ही ७ वर्षांची असूनही तिने झालेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली. डॉ. शशिकला एम. यांच्या न्याय वैद्यकीय पुरावा न्यायालयाने ग्राह्य मानला. प्रसन्न जोशी यांचा युक्तीवाद, न्याय वैद्यक अहवास साक्षीदारांच्या साक्षी यांचा विचार करुन न्यायालयाने अनिल बनकर यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सदर खटल्यामध्ये पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वेणुनाद ढोपरे, एन.ए. नलवडे यांनी सहकार्य केले.