लोणी काळभोर : पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवार (१९ ऑगस्ट) रोजी दुचाकी इंडीकावर आदळुन झालेल्या अपघातातात गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचा पाच दिवसानंतर उपचारादरम्यान आज (मंगळवारी) बारा वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला आहे.
अथर्व तुषार साळुंखे (वय १७, रा. पठारेवस्ती, लोणी स्टेशन) असे मुलाचं नाव आहे. शुक्रवारी एमआयटी कॉर्नरवर अपघात झाला होता. यामध्ये अथर्वच्या डोक्यास गंभीर जखमा झाल्याने, त्याच्यावर पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. अथर्व हा लोणी स्टेशन परीसरातील नामांकित प्रिटींग व्यावसायिक तुषार साळुंखे यांचा मुलगा आहे. अथर्वच्या जाण्याने लोणी स्टेशन हद्दीतील पठारे वस्ती परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे.
शुक्रवारी सकाळी अथर्व हा लोणी स्टेशनहुन पुणे सोलापूर महामार्गावरून थेऊर फाटा येथे दुचाकीवरुन निघाला होता. तो एमआयटी कॉर्नरवर आला त्यावेळी एक इंडीका एमआयटीकडुन पुणे-सोलापुर मार्गावर येत होता. तर दुसरीकडे एक लाल रंगाचे चारचाकी वाहन उरुळी कांचनकडे भरधाव वेगाने जात होते. लाल रंगाच्या वहानाने त्याला कट मारल्याने अथर्व इंडीकावर जाऊन आदळला. यावरून उडुन तो रस्त्यादुभाजाकवर पडला. अपघातात डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी तात्काळ लोणी स्टेशन येथील खाजगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. तेथे त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने नातेवाईकांनी त्याला पुण्यातील मोठ्या रूग्णालयात उपचारासाठी हलविले होते. मात्र त्या ठिकाणी उपचार चालु असताना, त्याचा मृत्यु झाला.