शेलपिंपळगाव (पुणे) : भोसे (ता. खेड) येथे एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छातीत गोळी लागल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला असून चाकण पोलिसांनी दोन भावांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. प्रसाद खांडेभराड (वय २२, रा. कडाचीवाडी, ता. खेड) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी सूरज ऊर्फ उद्धव कुटे (वय २५) व सौरभ कुटे (वय २३, दोघेही रा. भोसे, ता. खेड) या दोन भावांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुरुवारी (दि. ३) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भोसे ते काळुस रस्त्यावर ही घटना घडली. गुरुवारी रात्री दहा ते अकराचे सुमारास फिर्यादी प्रसाद खांडेभराड व त्याचा मित्र सूरज ऊर्फ उद्धव कुटे यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यातून फिर्यादी खांडेभराड याने उद्धव कुटे याला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी आपसातील वाद मिटविला. पुन्हा फिर्यादी प्रसाद हा आरोपी कुटे याला गाडीवरून सोडण्यासाठी त्याच्या घरी गेला. त्यावेळी आरोपीचा भाऊ सौरभ कुटे याला आपल्या भावाला प्रसादकडून मारहाण झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सौरभ कुटे व त्याच्या मित्रांनी फिर्यादी प्रसाद खांडेभराड याला जबर मारहाण करून गावठी पिस्तूलमधून फिर्यादी प्रसाद खांडेभराड याच्यावर गोळी झाडली. छातीत गोळी लागून प्रसाद गंभीर जखमी झाला.
त्यानंतर चाकण पोलिसांच्या पथकाने राजगुरुनगर जवळील सातकरस्थळ परिसरात नातेवाईकाच्या घरातून आरोपी सूरज व सौरभ कुटे यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, प्रसन्न जराड अधिक तपास करत आहेत.