पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर याच्यातर्फे आयोजित चौथ्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ’विश्वनाथ स्पोर्ट्स मीट- २०२०’ या स्पर्धेत क्रिकेटमध्ये दिघी येथील एआयटी संघाने तसेच मुंबईच्या वर्तक महाविद्यालयाने सोमवारी विजयी सलामी दिली.
विद्यापीठाच्या लोणी काळभोर येथील मैदानावर ही स्पर्धा आजपासून सुरु झाली. दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एआयटी) संघाने लोणी काळभोर येथील एमआयटी स्कूल आॅफ इंजिनिअरिंग संघावर ९ गडी राखून सहज विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करणारा एमआयटी एसओई संघ १५ षटकांत अवघ्या ८० धावांवर गारद झाला. हर्षने १३ धावांत ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात, एआयटीने अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले.यात जय याने सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले.
मुंबईच्या वर्तक महाविद्यालयाने चुरशीच्या लढतीत सांगली महाविद्यालय संघावर ४ धावांच्या निसटत्य फरकाने मात केली. वर्तक महाविद्यालयाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ७ बाद ६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, सांगली महाविद्यालय संघाला ६३ धावाच करता आल्या. २४ धावा आणि ४ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणारा तेजस डोंगरे विजयाचा शिल्पकार ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले. यावेळी शिरूरचे आमदार अशोक पवार, |ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कारविजेती नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकर, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलसचिव शिवशरण माळी, विश्वनाथ स्पोर्ट्स मीटच्या नियोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश पाटील, डॉ. किशोर रवांदे, समीर दरेकर, सुभेदार सोममंगल गायकवाड, क्रीडा संचालक पद्माकर फड यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. राष्ट्रीय खेळाडू अहोना मजुमदार, सिद्धार्थ गर्ग यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. सतीश पाटील यांनी प्रस्ताविक तर, सुदेशना रे, वैष्णव काळभोर आणि श्रेया उटेकर या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. स्टीफन सॅबेस्टियन याने आभार मानले.युवांनी सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा : क्रीडामंत्री सुनील केदार‘‘उत्तम आरोग्यासाठी खेळणे महत्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून खेळात सहभागी व्हावे. आरोग्य चांगले असले तर विचार मजबूत होतात. राज्याचा क्रीडामंत्री म्हणून खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम माझे आहे. ते येत्या काळात मी करणारच आहे. आजघडीला जगात सर्वाधिक युवक आपल्या देशात आहे. मात्र, आपला युवावर्ग हा सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकला आहे. दिवसातील सरासरी ८ तास तो इंटरनेटवर असतो. या आभासी दुनियेत रममाण होऊन आपला युवा वर्ग वास्तवापासून दूर जात आहे. अशी पिढी घेऊन आम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर शस्त्र म्हणून व्हायला हवा. युवांनी सोशल मीडिया आणि इंटरनेटचा अतिरेक टाळावा. यासाठी युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून लवकरच योजना जाहीर करण्यात येईल,’’ असे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नमूद केले.
तेजस्विनी सावंत म्हणाली, ‘’राज्यात खेळासाठीचे वातावरण तयार होत आहे.खेळात खूप चांगले करिअर आहे. मेहनतीला कोणताही पर्याय नसतो. शांतचित्ताने खेळून जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. भारताची शान असलेला तिरंगा जगाच्या क्षितिजावर अभिमानाने फडकला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा.’’