पुणे : सध्याच्या राजकारणात निष्ठा आणि विचारांना अर्थ राहिलेला नाही. गुंडगिरी आणि भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. यामुळे राजकारणापासून दूर राहणाऱ्या तरुणांनी देशात लोकशाही टिकवण्यासाठी राजकारणात यावे, असे आवाहन करतानाच सुशिक्षित तरुण राजकारणात आला तर देशाला निश्चितच समर्थ नेतृत्व मिळू शकेल, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित ७व्या युवा संसदेचे उद्घाटन नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर उपस्थित होते.
खासदार संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना आदर्श खासदार पुरस्कार, माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, सरपंच दिलीप घोलप यांना आदर्श सरपंच पुरस्कार, तर उद्योजक सनी निम्हण यांना आदर्श युवक पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. पुणेरी पगडी, शाल, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. या संस्थेच्या 'उडान' यावार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
राजू शेट्टी म्हणाले, तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी आपण राजकारणात कशासाठी येणार आहोत, हे उद्दिष्ट निश्चित करावे. राजकारण म्हणजे केवळ पैसा, प्रसिद्धी आणि सत्ता मिळवण्याचे साधन नाही तर ते समाजाची सेवा करण्याची एक संधी आहे. राजकारणामध्ये अनेक समस्या असल्या तरी या देशाला लोकशाहीच पुढे नेऊ शकते. ओमराजे निंबाळकर म्हणाले, राजकारणामध्ये निष्ठा कायम ठेवली तर यश निश्चितच मिळते. समाजाविषयी तळमळ तुमच्या कामातून दिसली, तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात.
संजय जाधव म्हणाले, भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि निष्ठाहीन लोकांनी भरलेल्या आजच्या राजकारणामध्ये जर तरुणांना यावेसे वाटले तर त्यांनी कोणाकडे पाहावे? असा प्रश्न आहे. परंतु, राजकारण वाईट आहे, असे समजून त्यापासून दूर राहू नका. साईनाथ बाबर म्हणाले, राजकारण हे समाजव्यवस्था बदलण्यासाठीचे साधन आहे, ते आपल्या हाती असेल तर निश्चितच समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो.