पुणे : मंडपातील सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या पांढऱ्या कपड्यावरुन उठ, कापड खराब होईल असे म्हटल्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना गंज पेठ परिसरात घडली. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
किसन गोविंद कसबे (वय २८, रा. लोहियानगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी साहिल सुशील अडागळे (वय १९, रा. सावधान मित्र मंडळाजवळ, गंज पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसबे याने याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अडागळे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. किसन कसबे आणि अभिजीत पाटोळे गंज पेठेतील क्रांती मित्र मंडळाजवळ नवरात्रोत्सवाचा मंडप बांधत हाेते. त्यावेळी आरोपी साहिल मंडपातील सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कापडावर बसला होता. कसबेने साहिल कापडावरुन उठण्यास सांगितले. कापड खराब हो्ईल, असे सांगितल्याने साहिल चिडला. त्यानंतर साहिलने त्याच्याकडील तीक्ष्ण शस्त्राने कसबेवर वार केले. पोलीस उपनिरीक्षक डोंगळे तपास करत आहेत.