जेजुरी : मराठा आरक्षणासाठी पुरंदरमधील पिंगोरी गावच्या तरुणाने आज रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर तालुक्यातील मराठा मोर्चाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आत्महत्येला मुख्यमंत्रीच कारणीभूत असून मराठा आरक्षणासाठी अजून किती बळी घ्यायचे आहेत. मराठा आरक्षण देणार आहात की नाही? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. घटनेची माहिती मिळताच मराठा क्रांती मोर्चातील संदीप जगताप, प्रशांत वांढेकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत, नगरसेवक गणेश जगताप, अजिंक्य देशमुख, सुरेश उबाळे, निलेश जगताप, ज्ञानोबा जाधव, भरत निगडे, राहुल शिंदे, प्रकाश शिंदे, प्रकाश पवार, हेमंत सोनवणे, दत्तात्रय बोरकर, आदींसह मराठा मोचार्चे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याचबरोबर शासनाच्या दिरंगाईचा हा बळी असून याच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी. शिंदे यांच्या परिवाराला ५० लाखांची आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी. त्यांची पत्नी किंवा भाऊ यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. याच प्रकारचे निवेदन मयत शिंदे यांच्या कुटुंबिय निलेश तुकाराम शिंदे, राजाराम महादेव शिंदे यांनी तहसीलदार सचिन गिरी व पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यावेळी घोषणाबाजी करण्यात येत होती. पोलिसांकडून संतप्त मराठा कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात येत होते. कार्यकर्त्यांच्या भावना शासनदरबारी त्वरित कळवून शिंदे परिवाराला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असे तहसीलदार सचिन गिरी यांनी सांगितले.बारामती विभागीय अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप पखाले, हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड, भोर उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहा.पोलीस निरीक्षक अंकुश माने, तहसीलदार सचिन गिरी, नायब तहसीलदार डी. एस. यादव आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.मयत शिंदे यांचा मृतदेह त्यांच्या पिंगोरी येथे आणला असता ग्रामस्थांनी शासनाकडून लेखी आश्वासन द्यावे अन्यथा त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेतला. पुरंदरचे तहसिलदार सचिन गिरी यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच मृतदेहावर अंत्यसंकार करण्यात आले. परिसरातील तणावाचे वातावरण पाहून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आत्महत्येला मुख्यमंत्रीच कारणीभूत : मराठा मोर्चाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 8:36 PM
कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आत्महत्येला मुख्यमंत्रीच कारणीभूत असून मराठा आरक्षणासाठी अजून किती बळी घ्यायचे आहेत. मराठा आरक्षण देणार आहात की नाही? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
ठळक मुद्देग्रामस्थांनी शासनाकडून लेखी आश्वासन द्यावे अन्यथा अंत्यसंस्कार करणार नसल्याचा घेतला पावित्रा मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे विजय शिवतारे यांच्याकडून लेखी आश्वासन