धनकवडी : पाच दिवसापुर्वी आत्महत्या करणार असल्याचे स्टेटस व्हाॅट्स अॅपवर टाकून घरातून निघून गेलेल्या युवकाचा मृतदेह हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सापडला आहे. तानाजी विष्णू शितोळे (वय ३९, रा. सुखसागरनगर, कात्रज) हे मृताचे नाव असून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तानाजी हरवल्याची तक्रार देवूनही पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास शितोळे कुटुंबियांनी नकार दिला आहे. तानाजी चा भाऊ रावसाहेब शिताळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तानाजी बेपत्ता असल्याची तक्रार ६ जून ला दाखल केली होती.तानाजी विष्णू शितोळे हे प्रशांत कळसकर यांच्या गाडीवर चालक म्हणून गेले १५ वर्षांपासून काम करीत होते. मात्र मागील दोन वर्षापासून कळकसर हे तानाजी शितोळे यांना पगार देत नव्हते. म्हणून त्यांच्यामध्ये वादविवाद होत होते. मयत तानाजी शिताळे यांनी यावरून कळसकर यांना मारहाण सुद्धा केली होती. याबाबत कळसकर यांनी शिताळे यांच्या विरोधात दिनांक ३ जून रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तसेच सात आठ लोकांना घेऊन शिताळे यांच्या घरी गेले होते. यामुळे घाबरून जाऊन शितोळे यांनी घर सोडून बाहेर गेले. दुसऱ्या दिवशी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार एन.एम. शिंदे हे शिताळे यांच्या घरी तपास करण्यासाठी गेले असता मयत तानाजी शिताळे यांच्या मोबाईल वर संपर्क करून शिवीगाळ केली. यामुळे शिताळे हे घरी गेलेच नाही. त्यानंतर दिनांक ५ जून रोजी रात्री १२.३० ला व्हाॅट्सअॅपवर मी आत्महत्या करीत आहे आणि माझ्या आत्महत्येला प्रशांत कळसकर जबाबदार असतील असे स्टेटस ठेवले. या घटनेमुळे घाबरून जाऊन रावसाहेब शिताळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये ६ जून ला मिसींग ची तक्रार दाखल केली. मात्र दोन दिवस यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आणि दिनांक ७ जून ला रात्री ११.०० वाजता शिताळे यांचा मृतदेह चांदणी चौकात मिळून आला.
रावसाहेब शिताळे म्हणाले - माझा भाऊ तानाजी शिताळे यांच्या मृत्युला प्रशांत कळसकर , पोलीस एन.एम. शिंदे जबाबदार आहेत. त्यांच्या विरुद्ध तक्रार देऊन कारवाई होत नाही. स्वारगेट तसेच पोलीस आयुक्त कार्यालय येथे सुद्धा आम्ही गेलो होतो. माझ्या भावाच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली नाही तर मी माझ्या कुटुंबासह पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आत्महत्या करणार आहे असा इशारा रावसाहेब शिताळेे यांनी दिला आहे.
सोशल मीडियावर सजगतेने नजर ठेवणाऱ्या राज्याच्या सायबर विभागामुळे एका तरुणाला शनिवारी आत्महत्येपासून रोखण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांंचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहचले आणि आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या त्या तरुणाचा जीव वाचवला. मात्र आत्महत्या करीत असल्याचे हाँट्स अँप स्टेटस ठेवणारा युवक दोन दिवस झाले बेपत्ता आहे. अशी तक्रार दाखल करुन ही पोलीसांना त्या तरुणांचा जीव वाचवता आला नाही.
विष्णू ताम्हाणे,पोलिस निरिक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन (गुन्हे) म्हणाले, तानाजी शितोळे यांनीच प्रशांत कळसकर यांना मारहाण केल्याच्या तीन तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल होत्या. त्या पार्श्वभुमीवर हवालदार शिंदे तपासाचा भाग म्हणून शितोळे यांच्या घरी गेले होते. मात्र याबात शितोळे कुटुंबियांचा गैरसमझ झाला आहे.