पुणे : नोकरीवरुन काढून टाकल्याने फेक फेसबुक खाते तयार करुन त्याद्वारे मोबाईल नंबर व अश्लील व्हिडिओ पाठवून बदनामी करणाऱ्या तरुणाला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आत्मराम प्रकाश बेळगे (रा. कसबा पेठ, मुळे गाव वाळुंज, ता. पाथर्डी, जि़ अहमदनगर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बेळगे हा फिर्यादी यांच्याकडे कामाला होता. त्यांच्याशी काही कारणावरुन वाद झाल्याने त्याला कामावरुन काढून टाकले होते. या रागातून बेळगे याने फिर्यादी यांच्या नावाने ३ बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. त्यावर कॉल मी एनी टाईम अशी पोस्ट तयार केली. तसेच अश्लिल व्हिडिओ प्रसारीत केले. त्यामुळे त्यांना रात्री अपरात्री वेगवेगळ्या क्रमांकावरुन फोन येऊ लागले. त्याचा त्यांना मानसिक त्रास झाला. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन त्याआधारावर आत्माराम बेळगे याला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस उपनिरीक्षक मंदा नेवसे, कर्मचारी हर्षल दुसाने, महिला कर्मचारी ज्योती दिवाणे यांच्या पथकाने केली.
कोणतेही कृत्य राहत नाही लपून
कितीही हुशारीने सोशल मिडियावरुन केलेले कृत्य हे लपून रहात नाही. त्याचा कोठेना कोठे पुरावा असतो. त्याचा छडा सायबर पोलिसांकडून घेतला जातो. पुणे सायबर पोलीस ठाण्याची सोशल मिडियावर गुन्हे करणाऱ्यांवर नजर आहे. असा काही प्रकार कोणाच्या बाबतीत घडल्यास न घाबरता गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.