पुणे : शहरातील गुन्हेगारीचा पॅटर्न दिवसेंदिवस बदलत आहे. शहरासह पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड आणि नगरचा ‘गुन्हेगारी पॅटर्न’सारखाच आहे. शहर पोलिस आयुक्त म्हणून रितेश कुमार यांनी एक वर्षापूर्वी पुणे पदभार स्वीकारला तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी १०० पेक्षा अधिक टोळ्यांवर ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई केली. धक्कादायक म्हणजे मोक्कातील एकूण ६५० आरोपींपैकी ३९६ आरोपींचे वय अवघे १९ ते २५ वर्षे आहे. यावरून गुन्हेगारी जगताकडे युवकांचा ओढा अधिक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
रितेश कुमार यांनी वर्षपूर्ती निमित्त एकंदरीतच शहरातील गुन्हेगारी संदर्भात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पुणे पोलिस आयुक्त होण्यापूर्वी मी राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) कार्यरत होतो. त्यावेळी मी अनेक गुन्ह्यांचे विश्लेषण केले आहे. ज्याप्रमाणे गुन्हेगारीचा पॅटर्न बदलत आहे, तसाच तो मोडीत काढण्यासाठी पोलिस पॅटर्न राबवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. या वेळी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर आयुक्त प्रशासन अरविंद चावरिया, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांची उपस्थिती होती.
मागील ५ ते ७ वर्षांचा विचार केला तर आर्थिक आणि सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी वाढत आहेत. त्या साेडविण्याच्या दृष्टीने आवश्यक मनुष्यबळ वाढविण्यात येत आहे. त्यात आवड असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेत घेण्यात येणार असल्याचेही पाेलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले. मुंबईबरोबरच पुण्यालादेखील सतत दहशतवादी कारवाईचा धोका असतो. त्यामुळे याकडे सुद्धा बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
असा हाेताेय सकारात्मक परिणाम :
शहरात दररोज सुरू असलेल्या मोक्का आणि स्थानबद्धतेच्या (एमपीडीए) कारवायांमुळे गुन्हेगारी टोळ्यांवर जरब बसत आहे. परिणामी गेल्या काही दिवसांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दराेड्याची तयारी, जबरी चोरी, गर्दी, मारामारी आणि घरफोडी सारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण निरंक आहे. यावरून शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण घटत असल्याचे दिसून येते.
प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका :
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. यात तब्बल ३६ हजार ८१६ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गेल्यावर्षी ७ हजार ८८८ गुन्हेगारांवर अशी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.
‘माय सेफ पुणे’चा हाेताेय प्रभावी वापर :
शहरातील गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच असुरक्षित ठिकाणांवर बीट मार्शल, दामिनी पथकांद्वारे गस्त वाढवण्याच्या हेतूने पोलिसांनी माय सेफ पुणे या ॲपची निर्मिती केली आहे. शहरातील असुरक्षित ठिकाणांवर लक्ष ठेवणे हाच याचा उद्देश आहे. यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे नागरिकांचाही यात सहभाग वाढत असून, या ॲपचा आणखी प्रभावी वापर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केला जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
आयुक्तालयाला नवीन इमारत :
शहराचा वाढलेला विस्तार, पोलिस ठाण्यांची वाढलेली संख्या आणि कामाचा भार, यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयासाठी सध्याची इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर सध्याचे आयुक्तालय आहे, त्याच जागेत पुणे पोलिस आयुक्तालयासाठी सुसज्ज नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहितीही पोलिस आयुक्तांनी दिली. मात्र, अद्याप त्याची सर्व प्रक्रिया बाकी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार, हे निश्चित नाही.
गुन्हेगारी १०० टक्के संपणारी नाही; पण गुन्हे घडूच नयेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तक्रार तत्काळ नाेंदवून घेण्यात येत आहे. अनेक योजनांची अंलबजावणी करण्यात येत आहे. बिट मार्शल, दामिनी पथकांची संख्या वाढवली आहे. माय सेफ पुणेचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. अशा प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अनेक गंभीर गुन्हे आम्ही थांबवू शकलो.
- रितेश कुमार, पोलिस आयुक्त