यवत (पुणे) : खामगाव गावाच्या हद्दीत खताळ मोरी जवळ अज्ञात वाहनाने धडक देऊन युवकाचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असताना अपघात नसून खून असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
शनिवारी (दि. ८) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास खामगाव येथील खताळ मोरी जवळ दुचाकी (नं. एम. एच. ४२/ पी /०८१४) वरून जाणारे नितीन सुनील भालसिंग ( वय २३ , रा. भालसिंग मळा , खामगाव ,ता.दौंड ) यांना अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली होती. अपघातात नितीन भालसिंग याचा गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला होता. याबाबतचा तपास पोलीस हवालदार दौंडकर करत होते.
तपास करत असताना मयत नितीन भालसिंग यांना आरोपी सतीश भीमराव भालसिंग याने मागील भांडणाचा राग मनात धरून जाणीवपूर्वक जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या ताब्यातील कॉलिस गाडीने (क्र.एम.एच.१२ ,बी.व्ही.१२२६ ) मागून धडक मारली खाली पाडले व मारहाण केली आणि नंतर तेथून गाडी घेऊन पळून गेले असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी सतीश भीमराव भालसिंग याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले पुढील तपास करीत आहेत.