किरण शिंदे, पुणे : येरवड्याच्या तुरुंगात असलेल्या 'भाई'चा भर रस्त्यात बर्थडे साजरा करणे त्याच्या पंटर लोकांना चांगलेच महागात पडले आहे. या पंटर लोकांनी भाईचा बर्थडे साजरा करताना येरवडा कारागृहाची प्रतिकृती असलेला केक आणला होता आणि त्यावर स्वयंघोषित 'भाई'चा फोटो लावून भर रस्त्यात केक कापला होता. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी आता या पंटर लोकांवर कारवाई केली आहे. आणि त्यांचीही रवानगी 'भाई' रहात असलेल्या तुरुंगात केली आहे. हा संपूर्ण प्रकार चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जनता वसाहत जनवाडी परिसरात घडला.
ओम बुरुड उर्फ सोनू, अनिकेत कातुर्डे उर्फ मन्या, युवराज बोराडे उर्फ बाळा, अनिकेत धोत्रे, विशाल रत्नाकर या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर यांच्यासह आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार श्रीधर विश्वास शिर्के यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जनवडी परिसरातील रेकॉर्ड वरील आरोपी शुभम प्रदीप शिरकर सध्या येरवडा कारागृहात आहे. कोयत्याने सर्वसामान्य नागरिकांच्या वस्तूंची तोडफोड केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंद आहे. दरम्यान १ जानेवारीला त्याचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस करण्यासाठी अटकेत असलेल्या आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवून त्याचा वाढदिवस साजरा केला. येरवडा कारागृहाची प्रतिकृती असलेला केक बनवून तो केक तलवारीने कापून भर रस्त्यात वाढदिवस साजरा केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने याची दखल घेतली. गुन्हा दाखल करत आरोपींना अटकही केली. अधिक तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.