पवनानगर (पुणे) : पवना नदीपात्रात ब्राह्मणोली पुलाजवळ पोहण्यासाठी गेलेल्या काले गावातील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ३) सकाळच्या सुमारास घडली. मृतदेह शोधण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते.
शिवदुर्ग व वन्यजीवरक्षक संस्था मावळच्या सदस्यांनी दीड तासाच्या शोधमोहिमेनंतर त्याचा मृतदेह दुपारी साडेबाराच्या सुमारास बाहेर काढला. कृष्णा भाऊ कालेकर (वय १७) असे बुडून मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे.
बुडालेल्या या युवकाचा शोध घेण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टीम व वन्यजीवरक्षक मावळ संस्थेचे महेश मसने, राजेंद्र कडू, कुणाल कडू, हर्षल चौधरी, रतन सिंग, आकाश घरदाळे, वैष्णवी भांगरे, सागर कुंभार, दक्ष काटकर, यश वाडेकर, सचिन वाडेकर, अनिल आंद्रे, ओंकार कालेकर, सुनील गायकवाड, आदींनी परिश्रम घेतले.
या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विजय गाले, पोलीस कॉन्स्टेबल संतोष शेळके हे करीत आहेत. या युवकाच्या पश्चात वडील, आई व आजी असा परिवार असून, एकुलता एक असलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.