पुणे : श्रीकृष्ण मंडळाच्या दहीहंडीमध्ये ध्वनिप्रक्षेपकासमोर नाचत असताना एका मुलाच्या छातीत दुखू लागले. मित्राच्या दुचाकीवरून डॉक्टरांकडे जात असताना तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. मात्र, रुग्णालयात नेल्यानंतर पोलिसांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. कसबा पेठेत ही घटना काल (स्वातंत्र्यदिनी) रात्री घडली.सागर संजय पिंगळे (वय २६, रा. कसबा पेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे. सागर हा रात्री १५ आॅगस्टच्या दिवशी कसबा पेठेतील श्रीकृष्ण मंडळाच्या दहीहंडीमध्ये ध्वनिप्रक्षेपकासमोर नाचत होता. अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. मित्राला ‘डॉक्टरांकडे जाऊ’ असे तो म्हणाला.मित्रासोबत दुचाकीवर घरी जाण्यासाठी तो निघाला. तो दुचाकीवर मागे बसला होता; मात्र श्रीकृष्ण मंडळाजवळच तो अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
दहीहंडी उत्सवात युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:01 AM