शिक्रापूर : पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथे लाईटचे खासगी काम करणारा युवक विजेच्या खांबावर चढला असता विजेच्या बसलेल्या जोरदार धक्क्याने खाली पडून एकतीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अशी घटना नुकतीच घडली आहे.पिंपळे खालसा येथे तुकाराम धुमाळ हा युवक नेहमी लाईटची कामे करत होता. पिंपळे येथे लाईटचे काम करायचे असल्याने विद्युत वितरण कर्मचारी यांना कोणतीही कल्पना न देता नेहमीप्रमाणे स्वत:चे घरगुती काम करण्यासाठी येथील खांबावरील विद्युतप्रवाह रोहित्रातून बंद करून लाईटच्या खांबावर चढला होता. परंतु काम करण्याच्या ठिकाणी दोन ठिकाणहून विद्युतप्रवाह आला असल्याने विद्युतप्रवाह बंद करत असताना येथे दुसऱ्या बाजूचा विद्युतप्रवाह सुरु असल्याचे त्यास माहीत नव्हते. परंतु खांबावर चढून वायर कापत असताना अचानक शेजारील तारेला हात लागून विजेचा त्याला जोरदार धक्का बसल्याने लाईटचे काम करणारा युवक वरील विजेच्या तारेला चिटकून बसला. या वेळी शेजारी तेथे असलेल्या नागरिकांनी त्यास उंच काठीच्या सहायाने ढकलण्याचा प्रयत्न केला असता तो खाली पडला. परंतु या वेळी खाली पडत असताना जमिनीवर असलेल्या दगडाचा त्याच्या डोक्याला मार लागल्याने जखमी झाला. या वेळी त्यास तातडीने शिक्रापूर येथील रक्षक हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यास तातडीने वाघोली येथे पुढील उपचारासाठी नेले असता तुकाराम नाथोबा धुमाळ (वय ३१ वर्षे रा. पिंपळे खालसा ता. शिरूर जि. पुणे) याचा मृत्यू झाला. (वार्ताहर)
विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
By admin | Published: April 01, 2017 12:04 AM