पिंपरी : मैदानी खेळांमध्ये सरावातील सातत्य, आहार, व्यायाम, जिद्द आणि चिकाटी हेच रिओ आॅलिम्पिकमधील स्टेपलचेस स्पर्धेच्या अंतिम फे रीतील यश आहे, असे मत भारताची धावपटू ललिता बाबर हिने व्यक्त केले़ नॉव्हेल ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित चिंचवड येथील विद्यार्थ्यांच्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या़ या वेळी संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे, अनुराधा देशमुख, जेऊरकर उपस्थित होते़ या वेळी बोलताना ललिताने आपण वयाच्या १३व्या वर्षी धावण्याच्या सरावास सुरुवात केली़ अनेक लढतींत विजय प्राप्त केला़ घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना मला माझे ध्येय गाठायचे होते आणि आज ते मी मिळविले आहे़ परंतु, देशासाठी पदक जिंकता आले नाही, ही खंत आहे़ टोकिओ २०२०च्या आॅलिम्पिक स्पर्धेत देशासाठी नक्की पदक आणेन, असा विश्वास तिने व्यक्त केला़ या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ललिताने मी रोज पहाटे साडेतीन वाजता उठते़ साडेचार वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत धावण्याचा सराव करते़ आयुष्यात यशाला शॉर्टकट नसतो त्यासाठी प्रचंड कष्ट, ध्येय, कुटुंबाचा आधार, प्रशिक्षकाची शिकवण, गुरूंचा आशीर्वाद यांची गरज असते़, अशा टिप्स विद्यार्थ्यांना दिल्या. खेळाडूंचा आहार त्यांच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा असतो़ देशाचे प्रतिनिधित्व करताना अर्जुन पुरस्काराची घोषणा होताच अधिक आनंद झाल्याचे तिने सांगितले़ उसेन बोल्ट आपला आदर्श खेळाडू असून, आई-वडील प्रेरणास्थानी आहेत, असे सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मैदानी खेळाचा सराव करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. दोन वर्षांपासून कुटुंब सहवास टाळला होता़, असे ललिता बाबर यांनी सांगितले. इंटरनेटच्या जमान्यात विद्यार्र्थ्यांनी मैदानावर अधिक वेळ घालवावा, असा सल्ला तिने दिला़ (प्रतिनिधी)
जिद्द, चिकाटी, सरावामुळे यश
By admin | Published: September 02, 2016 5:59 AM