युगेंद्र पवारांनी दंड थोपटले; कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून घेतली आक्रमक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 03:47 PM2024-07-16T15:47:16+5:302024-07-16T15:49:56+5:30
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाने कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
NCP Yugendra Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे पवार कुटुंबातील संघर्ष उफाळून आला होता. या संघर्षाचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता असून तालुक्यातील राजकारण ढवळून निघत आहे. अशातच अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाने कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यापूर्वी अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात हा कुस्तीगीर संघ काम करत होता. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वीच युगेंद्र पवार यांना या बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून हटवल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर आता युगेंद्र पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
बारामती तालुका कुस्तीगीर संघाबाबत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, "कुस्तीगीर संघाने दादांच्या वाढदिवसानिमित्ताने मैदानी कुस्तीचे आयोजन केलं आहे. मात्र खरे मैदान आम्ही घेतो आणि घेत राहणार. मला बारामती कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून हटवल्याची चर्चा माझ्यापर्यंत आली आहे. पण माझ्या वकिलांनी मला सांगितलंय की, तु्म्हाला असं कोणीही अध्यक्षपदावरुन हटवू शकत नाही."
युगेंद्र पवार उतरणार बारामतीच्या आखाड्यात?
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बारामतीच्या राजकारणाची दिशा बदलून गेली आहे. बारामतीकरांनी थोरल्या पवारांना कौल दिल्याने येथील राजकारण ढवळून निघाले आहे. या निकालाचे दूरगामी परिणाम बारामतीच्या राजकारणावर होण्याचे संकेत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढण्यात विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त युगेंद्र पवार यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. बारामतीच्या निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीने युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, भावजय शर्मिला पवार, तसेच पुतणे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये पवार दाम्पत्याने इंदापूर, तर युगेंद्र यांनी बारामतीत लक्ष घातले. शहरातील प्रत्येक गल्लीत, भागात त्यांनी पायी फिरत प्रचार केला, बारामतीकरांशी संवाद साधत मतदानाचे आवाहन केले. बारामतीच्या विकासात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या असणाऱ्या योगदानाबाबत त्यांनी जाहीर भाषणातून सांगितले. यावरून चुलते अजित पवार आणि त्यांच्यात कलगीतुरादेखील रंगला. बारामती स्थानिक पक्ष कार्यालयाची सूत्रे त्यांनी पहिल्या दिवसापासून हाती घेतली. नवीन पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेत प्रचारात उतरविण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यामुळे आगामी काळात युगेंद्र पवार हे आणखी ताकदीने बारामतीच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे.