"बारामतीत तुतारी वाजणारच"; अजितदादांकडून चुकीची कबुली, पण पुतण्याने रणशिंग फुंकलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 05:20 PM2024-08-13T17:20:51+5:302024-08-13T17:25:10+5:30
अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे.
Yugendra Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार हे मतदारसंघ पिंजून काढत असून त्यांच्या उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यांकडूनही केली जाऊ लागली आहे. अशातच आता युगेंद्र पवार यांनीही अप्रत्यक्षरीत्या आपण निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं सुचवलं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात यंदा तुतारी वाजणार आहे, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
बारामतीतील उमेदवारीबद्दल बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, "पवारसाहेबांसाठी आम्ही सर्वत्र फिरतोय. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला पक्षासोबत कोणी नव्हतं. त्यामुळे आजोबांसाठी आपण फिरलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. तालुक्यात फिरायला लागल्यानंतर आमचा कार्यकर्त्यांसोबत आणि जनतेसोबत संपर्क वाढला. त्यामुळे माझ्या उमेदवारीबाबत लोक आग्रह धरत असतील. मात्र आपली महाविकास आघाडी आहे. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेते आहेत. तसंच पवारसाहेब आणि जयंत पाटील हे सर्वजण उमेदवारीबद्दल अंतिम निर्णय घेतील. पक्षातील ज्येष्ठ नेते उमेदवारीचा निर्णय घेतील आणि त्यानंतर मला कार्यकर्त्यांसोबत बोलावं लागेल, कुटुंबातील सदस्यांबद्दल बोलावं लागेल," अशा शब्दांत युगेंद्र यांनी विधानसभा उमेदवारीबाबत आपली भूमिका मांडली आहे.
दरम्यान, "आम्ही बारामती तालुक्यातील गावागावात फिरत असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक त्यांचे प्रश्न घेऊन आमच्याकडे येत असून आम्हीही हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत," असंही युगेंद्र पवार म्हणाले.
बारामती राजकीय वातावरण तापणार
लोकसभा निवडणुकीपासून अजित पवारांचे सख्ख्ये पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. या निवडणुकीत बारामती तालुक्यातूनही सुप्रिया सुळे यांना ४८ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळेच आता अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघात झालेली पवार विरुद्ध पवार राजकीय लढाई चांगलीच चर्चिली गेली. या लढाईचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना संधी देऊ शकतात.