बारामती (पुणे) : मंगळवारी (दि. ५) लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बारामतीच्या राजकारणाची दिशाच बदलून गेली आहे. बारामतीकरांनी थोरल्या पवारांना काैल दिल्याने येथील राजकारण ढवळून निघाले आहे. या निकालाचे दूरगामी परिणाम बारामतीवर होण्याचे संकेत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढण्यात विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त युगेंद्र पवार यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. बारामतीच्या निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीने युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, भावजय शर्मिला पवार, तसेच पुतणे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये पवार दाम्पत्याने इंदापूर, तर युगेंद्र यांनी बारामतीत लक्ष घातले. शहरातील प्रत्येेक गल्लीत, भागात त्यांनी पायी फिरत प्रचार केला, बारामतीकरांशी संवाद साधत मतदानाचे आवाहन केले. बारामतीच्या विकासात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या असणाऱ्या योगदानाबाबत त्यांनी जाहीर भाषणातून सांगितले. यावरून चुलते अजित पवार आणि त्यांच्यात कलगीतुरादेखील रंगला. बारामती स्थानिक पक्ष कार्यालयाची सूत्रे त्यांनी पहिल्या दिवसापासून हाती घेतली. नवीन पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेत प्रचारात उतरविण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली.
मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पक्ष कार्यालयात पोहोचले. ग्रामीण, शहरी भागातील नागरिकांच्या प्रचारादरम्यान निदर्शनास आलेल्या विविध समस्यांवर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आहे. जिरायती भागातील पाणी समस्येवर त्यांनी सध्या लक्ष केंद्रित केले आहे. शरयु फाउंडेशनच्या माध्यमातून टॅंकर सुरू करून पाण्याची गरज भागविली जात आहे. वादळी पावसाने नुकसान झालेल्या बाबुर्डी येथील शेतकऱ्यांना घर दुरुस्तीचे साहित्य त्यांनी पुरविण्यास पुढाकार घेतला. बारामतीकरांशी जनसंपर्क वाढविण्यास त्यांनी भर दिला आहे. प्रत्येेक गुरुवारी ते पक्ष कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यासाठी नागरिकांना अपाॅइंटमेंट घेण्याची गरज नसल्याचेदेखील त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे युगेंद्र पवार यांनी एकप्रकारे विधानसभा निवडणुकीचीच तयारी केल्याचे मानले जाते. सुप्रिया सुळे यांना बारामतीतून सर्वाधिक मताधिक्य मिळाले. त्यामुळे त्यांनी बारामतीत केलेल्या प्रचाराचीच सुळे यांच्या विजयाच्या रूपाने पावती मिळाली आहे. त्यामुळे बारामती लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या विधानसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काका-पुतण्यात लढत झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.
....रोहित पवार मॅन ऑफ द मॅच
बारामती लोेकसभा निवडणुकीत सुळे यांना दीड लाखापेक्षा अधिक मतांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर या निवडणुकीचे संपूर्ण नियोजन करणाऱ्या आमदार रोहित पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. आमदार पवार यांनी नव्याने प्रवेश केलेले कार्यकर्ते यांना या निवडणुकीत एकप्रकारे राजकारणाचे धडे दिले. स्वत: सर्वांशी संपर्क साधत प्रचारात सक्रिय केले. निवडणुकीच्या प्रचाराची, अगदी सभामंडपाच्या तयारीपासुन रणनीती आखली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भर सभांत त्यांनी आक्रमक प्रचार केला. प्रचाराच्या सांगता सभेत त्यांनी केलेल्या भावनिक भाषणाने अनेकांची मने जिंकली. त्यामुळे रोहित पवार यांना या निवडणुकीतील विजयाचे ‘मॅन ऑफ द मॅच’ मानले जाते.