पुणे : अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून करणाºया तरुणास जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली असून, अनैसर्गिक कृत्याच्या गुन्ह्यातून त्याची मुक्तता करण्यात आली आहे. मृतदेह बोपदेव घाटामध्ये टाकून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तरुणासह त्याच्या वडिलांनाही ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, सबळ पुराव्याअभावी त्याच्या आईची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश पी.सी. भगुरे यांनी दिला.वृषाल मधुकर काळाणे (वय १९) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून, वडील मधुकर सोपान काळाणे (वय ५५, दोघेही, रा. भेकराईनगर, फुरसंगी, ता. हवेली) याला ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आई नलिनी हिची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.ओम बनकर (वय १०) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मयताचे वडील अजित सूर्यकांत बनकर (वय ३७,रा. भेकराईनगर, फुरसंगी ता. हवेली) यांनी हडपसर पोलिसात फिर्याद दिली होती.ही घटना २७ जुलै २०१४ रोजी दुपारी पावणेतीन ते २८ जुलै २०१४ रोजी पहाटेच्या दरम्यान घडली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी ९ साक्षीदार तपासले. यात परिस्थितीजन्य पुरावा महत्त्वाचा ठरला. हडपसर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला.श्रमातील पैशातून दंड भरा.न्यायालयाने वृषाल याला एक लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. ते पैसे मयत ओम याच्या वडिलांना नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे. दंडाची रक्कम रोख स्वरूपातही भरता येईल. जर रोख स्वरूपात पैसे नसल्यास, तुरूंगात केलेल्या श्रमाच्या मोबदल्यातून दंड भरता येणार असल्याचे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.
बालकाच्या खूनप्रकरणी युवकाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:34 AM