पुणे : सरकारी कामकाजातील विलंब टाळून ठराविक कालमर्यातेत नागरिकांची आणि प्रशासकीय कामे निर्गत करण्यासाठी ‘झीरो पेंडन्सी अँड डेलि डिस्पोजल’ अभियान अत्यंत प्रभावी अभियान आहे. या अभियानची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकाºयांना मार्गदर्शन करताना दिल्या.विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘झीरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल आणि प्रतिबंधक कारवाई’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी दळवी बोलत होते. कार्यशाळेसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी कविता द्विवेदी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.दळवी म्हणाले, ‘‘जनतेला चांगले प्रशासन देण्याचे आपले काम आहे. चांगले प्रशासन असेल तर सर्व प्रश्न सुटतात. विकासकामांना गती मिळते. जनतेच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना आहेत, या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होण्यासाठी वेळेत कामांचा निपटारा झाला पाहिजे. वर्षानुवर्षे जनतेची अनेक प्रकरणे प्रलंबित असतात. ती तातडीने मार्गी लावली पाहिजेत. झीरो पेंडन्सी राबविण्यासाठी कामाचे टप्पे करणे महत्त्वाचे आहे.’’पहिल्या टप्प्यात सर्व अधिकाºयांनी त्यांच्याकडील सर्व प्रलंबित प्रकरणांची संख्या निश्चित करून त्या सर्व प्रकरणांचा निपटारा करावा. त्यासाठी सिक्स बंडल पद्धत, लिपिक दप्तरातील नोंदवही अद्ययावत करणे, ए, बी, सी आणि डी पद्धतीची यादी तयार करणे, अभिलेख कक्ष आदर्श करणे या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना ही दळवी यांनी दिल्या.पोलीस उपअधीक्षक (गृह) बरकत मुजावर यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले. पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी आभार मानले. या कार्यशाळेला कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक, विभागातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रमुख, पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते.
दर्जेदार सेवेसाठी ‘झीरो पेंडन्सी’, पोलीस ठाण्याचा कारभार लोकाभिमुख होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 6:54 AM