शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत चालली असून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पालिकेने ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रा’ची संख्या कमी केली आहे. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी सिंहगड रस्ता, धनकवडी-सहकार नगर आणि हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सर्वाधिक सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आहेत.
एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या ३०० च्या जवळपास पोहोचली होती. ती, गेल्या आठवड्यापासून खाली येऊ लागली आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या २८ पर्यंत खाली आली आहे. गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात सर्वाधिक असलेले रुग्ण जानेवारीपर्यंत कमी झाले होते. परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ज्याठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळून येत असलेल्या ठिकाणांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
शहरात सुरुवातीला रात्रीची संचारबंदी आणि त्यानंतर दिवसा संचारबंदी लागू करण्यात आली. सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र निश्चित करून तेथे निर्बंध घालण्यात आले होते. माहिती फलक लावणे, आवश्यकतेनुसार ‘बॅरिकेटस’ लावण्यात आले. बाहेरील नागरिकांना सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र असलेल्या सोसायट्यांमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली. या रुग्णांच्या घरातील नातेवाईक, व्यक्तींना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.
चौकट
क्षेत्रीय कार्यालयानिहाय प्रतिबंधित क्षेत्र
सिंहगड रस्ता : ९
धनकवडी-सहकारनगर : ९
हडपसर-मुंढवा : ४
वानवडी-रामटेकडी : २
नगर रस्ता : १
शिवाजीनगर : १
औंध-बाणेर : १
कसबा-विश्रामबाग : १
एकूण : २८
चौकट
झोपडपट्ट्या जवळपास कोरोना मुक्त
सध्या अस्तित्वात असलेल्या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांपैकी १० सोसायट्या, ६ इमारती, १ गुंठेवारी आणि १ झोपडपट्टीचा समावेश आहे. तर, अन्य स्वरूपाच्या १० प्रतिबंधित क्षेत्राचा समावेश आहे.