महाराष्ट्रात राष्ट्रवादीला शून्य जागा; धक्कादायक ओपिनियन पोलवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 05:06 PM2024-04-17T17:06:49+5:302024-04-17T17:12:03+5:30
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे.
Ajit Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत मतदारांचा कल नक्की कोणाकडे आहे, हे जाणून घेण्यासाठी विविध संस्थांकडून ओपिनियन पोल केले जातात. एबीपी न्यूज आणि सी वोटरने संयुक्तपणे केलेल्या ताज्या ओपिनियन पोलमधून महाराष्ट्रातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज या पोलमधून वर्तवण्यात आला आहे. याबाबत बारामती इथं पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत तुमच्या पक्षाला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "तो सर्व्हे आहे, रिझल्ट काय लागतो ते बघा." दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील सर्व जागा महायुती जिंकणार असल्याचा दावा केला आहे.
"अजून काही जागांवर आमचे उमेदवार निश्चित करण्याचं काम सुरू आहे. माझी आज देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होईल. आम्ही नेहमी फोनवर बोलत असतो, पण आज प्रत्यक्ष बैठक होईल. पहिल्या टप्प्यात जिथं मतदान होत आहे, त्या विदर्भातील सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकेल. माझं याबाबत प्रफुल्ल पटेल यांच्याशीही बोलणं झालं आहे. त्यांनी आपल्याला पोषक वातावरण असल्याचं सांगितलं," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
ताज्या ओपिनियन पोलमध्ये काय आहे लोकांचा कौल?
सध्याच्या महायुतीतील जागावाटपानुसार अजित पवारांची राष्ट्रवादी चार जागांवर लढत आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागांवर लढत आहे. अशातच एबीपी माझा - सी व्होटरचा ओपिनियन पोल आला असून यामध्ये महायुती ३० जागा जिंकताना दिसत आहे. तर मविआला १८ जागा दाखविण्यात आल्या आहेत.
अजित पवार यांना चारपैकी शून्य जागा मिळणार असल्याचा अंदाज या ओपिनिअन पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. तर शरद पवारांना पाच जागा जिंकता येणार आहेत. म्हणजेच बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे या पराभव करणार असल्याचा अंदाज आहे. तर शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव यांचा अमोल कोल्हे पराभव करणार आहेत. रायगडमध्ये देखील सुनिल तटकरे यांचा अनंत गीते पराभव करतील असा अंदाज आहे. उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर हे अजित पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.