पुणे : शहरातील ॲॅमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव भाजपला बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेता आला असता. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने एका रात्रीत दिलेला सशर्त पाठिंबा काढल्याने राज्यातील आघाडी सरकार तो रोखणारच हे निश्चित झाले. त्यामुळे बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर करून काहीही उपयोग नसल्याचे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे गुुरुवारची (दि. २६) सभा तहकूब करून तो ठराव पुढे ढकलण्याचा निर्णय भाजपला घ्यावा लागला.
येत्या ८ सप्टेंबरपर्यंत सभा तहकूब करण्यात आल्यानंतर दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा ‘राष्ट्रवादी’चा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपा कसून प्रयत्न करेल, असे सांगण्यात आले. महापालिका निवडणुकीची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्याने त्यास यश कितपत मिळणार, याबद्दल मात्र संदिग्धता आहे. राज्याच्या सत्तेत एकत्र असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या महापालिकेतील नेत्यांनी गुरुवारी एकत्र येत सत्ताधारी भाजपविरोधात ‘हम साथ साथ है !’ चा नारा दिला. ही दिलजमाई भाजपची डोकेदुखी वाढविणारी ठरणार आहे.
‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बुधवारी (दि. २५) मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसह नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन दिले आहे. यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत व स्थायी समितीच्या बैठकीत बहुमतावर भाजपने मंजूर केलेले चार विषय विखंडित करण्याची मागणी केली. यात ॲॅमेनिटी स्पेस भाडेतत्त्वार देणे, न्यायालयात वकील नियुक्ती, सदनिका भाडेतत्त्वावर देण्यासह ई-व्हेईकल खरेदी या ठरावांचा समावेश आहे.
चौकट
‘ॲॅमेनिटी स्पेस’वरून विरोधक एकत्र
ॲॅमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला दिलेला सशर्त पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसने काढून घेऊन विरोध कायम ठेवल्याने गुरुवारी (दि. २६) महापालिकेत प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल व शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी एकत्रित येत पुणेकरांच्या हितासाठी आम्ही कदापी या ॲॅमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा विषय मान्य होऊ देणार नसल्याचे जाहीर केले.