पुणे : झिका हा डेंग्यूसदृश विषाणूजन्य आजार आहे. मात्र, त्याचा संसर्ग गर्भवतींना झाल्यास त्यांच्या बाळांमध्ये मेंदूसह विविध प्रकारची गुंतागुंत निर्माण हाेऊ शकते. परंतु, सर्वच गर्भवतींच्या बाबतीत तसे होईल, असे नाही. मात्र, झिकाबाधित गर्भवती या ‘हाय रिस्क’ म्हणजे अतिजाेखमीच्या वर्गवारीत येतात. म्हणून गर्भवतींनी घाबरून न जाता स्त्रीराेगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गर्भाची साेनाेग्राफी व इतर तपासणी करत राहावी, असे आवाहन स्त्रीराेगतज्ज्ञांनी केले आहे.
झिका गर्भवतीला झाला, तर त्याचा संसर्ग बाळाला नाळेद्वारे हाेाताे. त्यामुळे बाळाच्या मेंदूचा आकार लहान हाेण्याचा धोका (मायक्राेसेफेली) अधिक असताे. त्याचबराेबर इतर जन्मजात व्यंगांसह बाळ जन्माला येऊ शकते. झिकामध्ये ‘कंजेनायटल ॲनाॅमली’ हाेतात. त्यामध्ये मेंदूचा विकास हाेत नाही. त्याचबराेबर वेळेआधी प्रसूती, गर्भपात, ब्रेन ॲनामली हाेऊ शकते. त्याला जन्मजात झिका सिंड्रोम म्हणतात, अशी माहिती आराेग्य विभागाने दिली आहे.
झिका विषाणू हा फलॅव्हीव्हायरस प्रजातीचा असून तो एडिस डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार आहे. झिका विषाणू हा मुख्यतः एडिस डासांद्वारे प्रसारित होणाऱ्या विषाणूमुळे होतो, जो दिवसा चावतो. राज्यातील पहिली रुग्ण ही जुलै २०२१ दरम्यान एनआयव्ही पुणे येथील पथकाने पुरंदर तालुक्यातील आढळला हाेता. त्यानंतर आता शहरात त्याचे १२ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ५ महिला गर्भवती आहेत.
झिकाचा गर्भवती महिलेच्या बाळावर नेमका काय परिणाम हाेईल, याबाबत आता काही शक्यता व्यक्त करता येत नाही. परंतु, त्या गर्भवतीची लक्षणे किती तीव्र आहेत, व्हायरल लाेड किती आणि बाळाकडे तो किती गेला, यावरही बरेच काही अवलंबून असते. पहिल्या तीन महिन्यांच्या आतील गर्भवती असेल, तर त्याचा परिणाम जास्त व तीन महिन्यांपेक्षा जास्त असेल तर परिणाम कमी हाेताे. लगेच उपचार केल्यास फारसा परिणाम हाेत नाही. बाळाचे स्कॅन करून त्याच्या वाढीवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.- डाॅ. मिलिंद तेलंग, वरिष्ठ स्त्रीराेगतज्ज्ञ
गर्भवतींची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांनी झिकाचा संसर्ग हाेऊ नये, याची काळजी घ्यावी. गर्भवतीला झिकाचे निदान झाल्यास प्रत्येकीच्या बाळावरच त्याचा परिणाम हाेईल असेही नाही. त्यापैकी काहींवर हाेऊ शकताे. स्त्रीराेगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार साेनाेग्राफी व इतर उपचार घ्यावेत. तसेच गर्भपात करायचा की नाही याबाबत तज्ज्ञांशी सल्लामसलत करून निर्णय घेऊ शकतात. घरात काेठेही डासांची उत्पत्ती हाेणार नाही, याची काळजी घ्यावी. - डाॅ. प्रदीप सांभारे, माजी विभागप्रमुख, स्त्रीराेग विभाग, बीजे मेडिकल