पुणे : शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत झिकाचा उद्रेक झाला आहे. या भागांमधील जास्तीत जास्त गर्भवतींचे रक्तजल नमुने झिका (Zika Virus) आजाराच्या निदानासाठी एनआयव्हीकडे पाठवावेत, असे निर्देश आराेग्य विभागाकडून परिमंडळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आतापर्यंत ११७ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
शहरात झिकाचे रुग्ण शहराच्या विविध भागांमध्ये नोंदविले गेले आहेत. उद्रेकग्रस्त भागातील १९९ नागरिकांचे आणि १६७ गर्भवतींचे रक्तनमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. शहरात २१ जूनपासून आतापर्यंत झिकाच्या २१ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये एरंडवणेमधील ६, मुंढवा येथील ४, डहाणूकर कॉलनीमधील २, पाषाणमधील ३, आंबेगाव बुद्रूक १, खराडी ३, कळसमधील १ आणि सुखसागरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये १० गर्भवतींचा समावेश आहे.
झिका उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर उद्रेकग्रस्त भागातील ५ किलोमीटर परिसरातील गर्भवती महिलांच्या रक्तजल नमुन्यांची चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून महापालिकेला पत्र पाठविण्यात आले होते, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली, तर ज्या गर्भवती महिला नमुने तपासणीसाठी देण्यास तयार नसतील, अशा महिलांकडून छापील अर्जावर असहमती दर्शविल्याची स्वाक्षरी घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपआरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली.