पुणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने जम्बो पगाराची ऑफर दिल्यानंतर ग्रामीण भागातील कोविड रुग्णालयांसाठी डॉक्टरांच्या भरतीला प्रतिसाद मिळू लागला आहे. बुधवारी (दि.28 ) रोजी आणखीन 31 एमबीबीएस डॉक्टरांची भरती करण्यात आले. त्यांना तात्काळ नियुक्तीपत्र देऊन जबाबदारीही सोपविण्यात आली. दरम्यान काही दिवसांपूर्वी 9 एमबीबीएस डॉक्टरांची भरती करण्यात आल्याने आतापर्यंत एकूण 50 एमबीबीएस डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात चालविल्या जाणाऱ्या कोविड रुग्णालयांसाठी एमबीबीएस डॉक्टरांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. सुरुवातीला या जाहिरातीला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, जिल्ह्यासह अन्य जिल्हा आणि राज्यातील एमबीबीएस डॉक्टरांची भरती करणार असून तब्बल 90 हजार रुपये पगाराची ऑफर देण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात इच्छुकांचे अर्ज आले. करार पद्धतीने तीन महिन्यांसाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना तात्काळ नेमणूक पत्र देण्यात आले असून, बुधवारी 31 जणांची नियुक्ती करण्यात आली, असे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले.
तातडीने एमबीबीएस आणि एमडी दर्जाचे डॉक्टर मिळावेत म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रथमच महाराष्ट्राबरोबर बारा राज्यांमध्ये डॉक्टर भरती ची जाहिरात केली होती. पगाराची जम्बो ऑफर देखील देण्यात आल्याने डॉक्टर भरतीला पहिल्याच दिवसापासून प्रतिसाद मिळत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी सांगितले.