लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे जिल्हा परिषदेने रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी तब्बल दोन कोटी रूपयांची रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी लेखी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी उपाध्यक्ष रणजित शिवतारे, आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबूराव वायकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण क्षेत्रात दररोज दोन ते अडीच हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असणारे रेमडेसिविर हे इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध होत नाही. औषधांचा काळाबाजार सुरू असून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने या इंजेक्शनच्या नियंत्रणासाठी कक्ष स्थापन करून टोल फ्री क्रमांक दिले आहेत. मात्र, त्यावर संपर्क होत नाहीत. त्यामुळे जिल्हा निधीमधून दोन कोटींची रेमडेसिविर इंजेक्शनची खरेदी करण्याची तयारी या बैठकीत करण्यात आली.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये ज्या धर्तीवर खाजगी रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेतले आहेत, त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालय आणि तेथील बेड्स कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेण्याची किती गरज आहे. त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात येतील, आवश्यक त्या ठिकाणी खाजगी रुग्णालय ताब्यात घेतले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात स्पष्ट केले.
जिल्हा नियोजनमधून रेमडेसिविरसाठी पाच कोटींची तरतूद करा
जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यावे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची कमतरता आहे. या ठिकाणी ऑक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यासाठी ऑक्सिजन पाईपलाईनचे काम तत्काळ सुरू केल्यास ऑक्सिजन बेड उपलब्ध होईल, जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून रेमडेसिविर इंजेक्शन खरेदीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
फोटो : जिल्हा परिषदेच्या वतीने दोन कोटी रुपयांचे रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करण्यात येईल. यासाठी साठा उपलब्ध करुन द्यावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देताना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे.