खोडद : जिल्हा परिषद शाळा आता इंग्लिश मीडियम स्कूलबरोबर स्पर्धा करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचं आणि इंग्लिश मीडियम स्कूलच्या बरोबरीचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याचं आव्हान जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सहजपणे स्वीकारत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. या शाळेचे मुख्याध्यापक अंबादास वामन आणि त्यांचे सहकारी यांनी या शाळेला दिलेलं रूप, येथील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ते जी मेहनत घेत आहेत, ती वाखाणण्याजोगी आहे, अशा शब्दांत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी हिवरेतर्फे नारायणगाव येथील सातपुडा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले.
हिवरेतर्फे नारायणगाव येथील सातपुडा जिल्हा परिषद शाळेत ‘उधळण सप्तरंगाची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, पंचायत समिती सदस्य रमेश खुडे, गटशिक्षण अधिकारी पी. एस. मेमाणे, उपसरपंच सुधीर खोकराळे, रोटरी क्लब अध्यक्ष शामराव थोरात, व्यवस्थापन समिती अध्यक्ष जालिंदर काकडे,ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रवीण शिंदे,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रोहिदास भोर, शिक्षक संघटनेचे नेते खंडेराव ढोबळे,मंगेश मेहेर, तालुकाध्यक्ष उपेंद्र डुंबरे ,रवींद्र वाजगे शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध संस्था आणि ग्रामस्थांनी या वेळी मोठ्या दातृत्वाच्या भावनेतून या शाळेला विविध शालोपयोगी साहित्य भेट दिले.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मुख्याध्यापक अंबादास वामन व रोहिदास मुळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रतिभा भोर, भारती मुळे यांनी केले. मुख्याध्यापक अंबादास वामन आणि रोहिदास मुळे या शिक्षकांनी या शाळेसाठी आणि या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जे परिश्रम घेतले आहेत त्याबद्दल सातपुडा ग्रामस्थांनीदेखील त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उत्तम आहे. सातपुडा शाळेतील शिक्षक अंबादास वामन व रोहिदास मुळे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत व कला-कौशल्यात अमूलाग्र बदल केल्याने त्यांनी आज पालकांच्या हृदयात स्थान मिळविले आहे. मलाही त्यांचा अभिमान वाटला. त्यांच्यासारख्या तरुण होतकरू शिक्षकांमुळे जिल्हा परिषद शाळा बदलत असून शाळांकडे पालकांची ओढ निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा हा उत्तमच आहे. या शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी जीव ओतून काम करत आहेत.- शरद सोनवणे,आमदार जुन्नर