दौंड : गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे शिक्षणपद्धती पूर्णपणे बदलून गेली आहे. आजही इथली शिक्षक पद्धती खूपच मागे असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यातूनही मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे आर्थिक विवंचनेत असलेल्या पालकांना आपल्या मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करणे शक्य होईनासे झाले आहे. या सर्व परिस्थितीच्या जाणिवेतून सामाजिक बांधिलकी जपत एका जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेने आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेशी चर्चा करून त्यांच्याकडून तब्बल ५० लाखांचा निधी आणला आहे. या निधीच्या माध्यमातून तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. एवढेच नाही तर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तालु्क्यातील एक हजार शिक्षकांचे हात धुवा प्रशिक्षणही घेण्यात आले. सुनीता विजय काटम असे या शिक्षकेचे नाव आहे.
अलीकडच्या काळात जस जसे तंत्रज्ञान वाढत गेले तस तसे शिक्षणाच्या पद्धतीतही बदल होत गेला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही नव नवे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना या नव्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी निधींची तरतूदही केली जात आहे. गेल्या एक दीड वर्षापासून असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे तर संपूर्ण शिक्षणाची पद्धतच बदलून गेली. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले पण अनेक ते मिळू शकले नाही किंबहुना ते घेण्यासाठी अनेक समस्या त्यांच्या पुढे आहे. कोरोना संकटामुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली गेली आहे. त्यामुळे अनेक पालकांना आपल्या मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणेही शक्य होत नाही. अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते किंवा लोकप्रतिनिधी असे अपवाद वगळता कोणीही शैक्षणिक सुविधा उभारण्यासाठी मोठ्या निधींची तरतूद करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे एेकावयास नाही. अशाच वडगावबांडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुनीता काटम यांनी ५० लाखांचा निधी विद्यार्थ्यांसाठी आणला आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त सुनीता काटम या पुण्यात आल्या होत्या. तेथे त्यांची ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी ओळख झाली. त्यानंतर काटम यांनी एकूणच विद्यार्थ्याच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती तसेच ऑनलाइन शिक्षण पद्धतीत येणाऱ्या अडचणींबाबत त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत ५० लाख निधींची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी केवळ परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विचार केला. काटम यांच्या विचाराने प्रभावित होऊन संस्थेने तब्बल ५० लाखांच्या निधीच तरतूद केली.
या निधीतील पैशाच्या माध्यमातून तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, पुस्तके, विविध खेळणी वाटप करण्यात आली. तसेच पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या ऊसतोडणी कामगारांच्या शाळाबाह्य मुलांनादेखील खेळणी वाटप करण्यात आली. आरोग्याच्या दृष्टिकोनातून या सामाजिक संस्थेमार्फत तालुक्यातील एक हजार शिक्षकांसाठी हात धुवा प्रशिक्षण घेण्यात आले. शालेय सुट्टीच्या कालावधीतही प्राथमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचे हात धुवा प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने ‘कार्टून व्हिडिओच्या’ माध्यमातून घेण्यात आले. या प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांनी उत्साही प्रतिसाद दिला. त्याचबरोबर ५३ हजार साबण विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांना पुरविण्यात आले, आंगणवाडीतील १२४ मुलांना दप्तरे, सातशे विद्यार्थ्यांना विदेशी खेळणी आणि शालेय दप्तरांसह इतर साहित्य देण्यात आले. या कामी संस्थेच्या वरिष्ठ सहव्यवस्थापक इपशिता दास, सहव्यवस्थापक हरीश वैद्य यांचे सहकार्य मिळाले असल्याचे सुनीता काटम यांनी सांगितले.
वडगावबांडे शाळेतील सुनीता काटम या उत्साही, उपक्रमशील आणि सामाजिक बांधिलकीच्या शिक्षिका आहे. त्यांनी कायमच सामाजिक संस्थांबरोबर संपर्क ठेवून तालुक्यातील विद्यार्थ्यांना सुमारे पन्नास लाखांच्या जवळपास शैक्षणिक लाभ मिळून दिलेला आहे. विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करून या विषयाची विद्यार्थिनींमध्ये जागरुकता वाढवलेली आहे. निश्चितच त्यांची सामाजिक सेवा कौतुकास्पद आहे.
नवनाथ वणवे
(गटशिक्षण अधिकारी)
पुण्यातील ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध सामाजिक उपक्रम आणि गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी कायमच सामाजिक सेवेत राहील. याकामी मला गटशिक्षण अधिकारी नवनाथ वणवे, केंद्रप्रमुख विजयकुमार पवार, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे वेळोवेळी सहकार्य असते.
सुनीता काटम, शिक्षिका
०५ दौंड
पाठेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा कारखाना परिसरातील ऊसतोडणी मजुरांच्या मुलीस शैक्षणिक साहित्य वाटप करतांना हरीश वैद्य आणि सुनीता काटम.