लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे जिल्हा परिषदेला २२ एप्रिलपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करणार आहे. यात पहिल्याच दिवशी दोन हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेने ५० लाख रुपयांची साडेबारा हजार इंजेक्शन सिप्ला कंपनीकडून खरेदी केली आहेत. त्यातील दोन हजार इंजेक्शनचा पाहिला पुरवठा २२ एप्रिल नंतर होणार आहे.
सिप्ला कंपनीना त्यांचे रेमडेसिविर हे इंजेक्शन १४६४ रुपया दराने जिल्हा परिषदेला दिले आहे. ५० लाख रुपयांची ही इंजेक्शन खरेदी असून टप्प्याटप्प्याने आणि गरजेप्रमाणे इंजेक्शनचा पुरवठा जिल्हा परिषदेला केला जाणार आहे. ही इंजेक्शन्स फक्त ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वापरले जाणार असून, त्याचे नियंत्रण तालुका आरोग्य अधिकारी मार्फत केले जाणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले. आवश्यकता वाटल्यास खरेदी दोन कोटी रुपयापर्यंत करण्याची तयारी जिल्हा परिषदेने केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, रेमडेसिविर हे इंजेक्शन खरेदीचे आदेश काढण्यात आले आहेत. सिप्ला कंपनीचे हे इंजेक्शन असून कंपनीकडून टप्प्याटप्प्याने त्याचा पुरवठा केला जाईल. पहिल्या टप्प्यातील दोन हजार इंजेक्शन्स २२ एप्रिल पासून मिळण्याची शक्यता आहे. ही इंजेक्शन्स जिल्हा परिषदेच्या मार्फत वितरित केली जातील मात्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासन या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या इंजेक्शन पुरवठ्याची याचा संबंध नसेल. तुटवडा आणि काळाबाजार रोखण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे. सरकारी आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये शासनामार्फत या इंजेक्शनचा पुरवठा होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
-------
ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हा परिषदेकडून खरेदी किंमतीचा उपलब्ध करून दिले जाईल. इंजेक्शन वितरणासाठी स्वतंत्रपणे नियमावली आणि प्रोटोकॉल असेल. इंजेक्शन खरेदीसाठी उपलब्ध करून दिलेला निधी हा इंजेक्शन विक्रीतून पुन्हा जिल्हा परिषद निधी मध्ये जमा होणार असल्याने तू पुन्हा पुन्हा वापरता येईल. इंजेक्शनची काळ्या बाजाराने होणारी विक्री रोखणे आणि रुग्णांना वेळेत उपलब्ध करून देणे यासाठी तातडीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
- निर्मला पानसरे, अध्यक्ष जिल्हा परिषद