पुणे : शासनातर्फे गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिपोर्ट कार्डमध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेने एकूण ७०३ व सरासरी ७८ टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.आरोग्य सेवेच्या या पद्धतीने मूल्यांकनाचे हे पहिलेच वर्षे आहे. आरोग्य विभागामार्फत ग्रामीण जनतेला प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा पुरविल्या जातात. या सर्व सेवांचे अहवाल नियमितपणे शासनाला सादर केले जातात. जुलै २०१४ पासून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करून त्याचा अहवाल दर महिन्याला सादर करण्याचे आदेश काढले होते.यात पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जुलै २०१४ ते मार्च २०१४ या कालावधीतील रँकिंग पाहता, पुणे जिल्ह्याला एकूण ७०३ व सरासरी ७८ टक्के गुण मिळाले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती, स्वच्छता, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवा, विविध राष्ट्रीय कार्यक्रमांची साध्य उद्दिष्टे, प्रशासकीय कामकाज, नावीन्यपूर्ण योजना, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना अशा अनेक बाबींवर रँकिंग केले जाते. जिल्ह्यात शारदा ग्राम आरोग्य संजीवनी कार्यक्रमांतर्गत मतांची आरोग्य तपासणी, प्रसूतीच्या दर्जेदार सेवा, बालकांच्या आरोग्याची काळजी, डे केअर सेंटरमध्ये ईसीजी तपासणी, नियमित नेत्रतपासणी, मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी व उपचार फिजिओथेरपीची सुविधा, वृद्धांची विशेष काळजी तसेच प्रयोगशाळेत १६ प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या केल्या जातात. यासाठी जिल्हा परिषदेने १३ कोटी रुपये रकमेची तरतूद केलेली होती. यामुळे प्रथामिक आरोग्य केंद्रांची आयोग्य सेवा दर्जेदार होत आहे. परिणामी ओपीडी रुग्णांची संख्येत दुप्पट वाढ, प्रसूती तिप्पट व आयपीडीची संख्या ५ पटींनी वाढली आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेची आरोग्यसेवा दर्जेदार
By admin | Published: May 15, 2015 5:19 AM