पुणे : ससून रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण मग ताे ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) असाे की आयपीडी (आंतररुग्ण) त्या प्रत्येकाला आता ससून हाॅस्पिटलमधील मेडिकल स्टाेअरमधूनच माेफत औषधे मिळणार आहेत. येत्या साेमवारपासून (दि. ३ एप्रिल) हाॅस्पिटलमध्ये ‘झिराे प्रिस्क्रीप्शन’ ची अंमलबजावणी केली जाणार आहे. जर बाहेरून काेणी डाॅक्टरांनी लिहून दिली तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांनी दिला आहे.
ससूनमध्ये दरराेज दीड ते दाेन हजार रुग्ण ओपीडीमध्ये उपचार घेण्यासाठी येतात तर आंतररुग्ण विभागात ११०० ते दीड हजार रुग्ण दाखल असतात. या सर्वांना औषधांची गरज पडते. परंतु, याआधी रुग्णाला जी औषधे लिहून दिली त्यापैकी निम्मीच मिळायची तर उरलेली औषधे बाहेरून खरेदी करावी लागत असत. त्यासाठी ससूनच्या आवारातील मेडिकलमध्ये रुग्णांची गर्दी व्हायची. मात्र, डाॅ. ठाकूर यांनी अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर रुग्णांना सर्वप्रकारचे औषधे ससूनच्या मेडिकल स्टाेअरमधूनच देण्यात यावेत, असा मानस व्यक्त केला हाेता.
ही औषधे ससूनमधील मेडिकल स्टाेअरमधून मिळावे यासाठी त्यांनी स्थानिक स्तरावरही औषधांची खरेदी केली आहे. तसेच, रुग्णांना लागतील त्या प्रकारचे औषधे देण्यात येणार आहेत. त्यासाठी नवीन स्वरूपाच्या दीडशे प्रकारच्या औषधांची खरेदी करण्यात आली आहे.
महिनाभराची मिळणार बीपी शुगरची औषधे
ज्या रुग्णांना बीपी, शुगर आहे अशा रुग्णांना महिनाभराची औषधे देण्यात येणार आहेत. या रुग्णांची आठवड्यांतून काही दिवस दुपारी स्पेशल ओपीडी असते तसेच पेशंटला डिस्चार्ज झाल्यावर सात दिवसांची औषधे माेफत दिली जाणार आहेत.
यापुढे प्रत्येक रुग्णाला ससूनमधूनच माेफत औषध देण्यात येतील. येत्या साेमवारपासून त्याची कडकपणे अंमलबजावणी केली जाईल. याबाबत निगराणी करण्यासाठी डाॅक्टरांना नेमण्यात येईल. जर बाहेरून काेणी औषधे लिहून दिले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे काेणत्याही रुग्णाला बाहेरून औषधे आणण्याची गरज पडणार नाही.
- डाॅ. संजीव ठाकुर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय