पुणे : नोकरी नसल्याने अनेक तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असतात. डिलिव्हरीसाठी त्यांन रात्रीअपरात्री जावे लागते. पहाटे डिलिव्हरी देऊन परत जाणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयला चौघांनी काेयत्याने वार करुन लुटले. ही घटना बालेवाडी येथील निकमार कॉलेजच्या गेटजवळ मंगळवारी पहाटे अडीच वाजता घडली.
याप्रकरणी सौरभ उत्तम गंगणे (वय २१, रा. शास्त्रीनगर, काळेवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ हे झोमॅटोची डिलिव्हरी करण्याचे काम करतात. मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ते डिलिव्हरी देऊन जात होते. त्यावेळी दोन मोटारसायकलीवरुन चौघे जण आले. त्यांनी निकमार कॉलेजच्या गेटजवळ त्यांना थांबविले. चिखलीला जायचा रस्ता सांग असे म्हणून त्यांना अडविले.
त्यांच्यातील एकाने कोयत्याने त्यांच्यावर वार केले. त्यांनी डावा हात मध्ये केल्याने तो वार त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसला. या हल्ल्याने तो खाली पडला. तेव्हा दुसर्याने त्यांच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. पाकिटात १७०० रुपये, आधारकार्ड, पॅन कार्ड, दोन बँकांचे एटीएम कार्डतसेच मोबाईल व सॅक, त्यामधील मोबाईलचा चार्जर, ब्ल्युटुथ असे साहित्य जबरदस्तीने लुटून चौघे राधा चौकाच्या दिशेने निघून गेले. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.