पुणे : नव्या प्रभाग रचनेमुळे प्रशासकीय कामात निर्माण झालेली अडचण प्रशासनाने आता नवी रचना करून दूर केली आहे. या नव्या रचनेनुसार पाच परिमंडळांमध्ये प्रत्येकी ३ याप्रमाणे १५ क्षेत्रीय कार्यालये देण्यात आली असून, त्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातंर्गत ३ प्रभाग देण्यात आले आहेत. एकूण ४१ प्रभागांचे याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे.प्रभागांची व क्षेत्रीय कार्यालयांची हद्द लोकसंख्येचा विचार करून निश्चित करण्यात आली आहे. चार सदस्यांचा एक प्रभाग या रचनेमुळे महापालिकेला पूर्वीची रचना बदलावी लागली. अंदाजपत्रकात आता या नव्या रचनेप्रमाणे प्रभागनिहाय खर्चाची तरतूद करण्यात येईल. नागरिकांना सोयीस्कर व क्षेत्रीय कार्यालय जवळ पडेल अशा पद्धतीने रचना करण्यात आल्याचे प्रशासनाचे स्पष्ट केले आहे.हद्द निश्चितीमुळे आता लवकरच प्रभाग समित्यांच्या निवडणुका घेण्यात येतील. या समित्यांमध्ये सर्व नगरसेवक तसेच अधिकारी व काही प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश असतो. नगरसेवकांनाच समितीच्या अध्यक्षपदासाठी उभे राहता येते. बहुतेक समित्यांवर भाजपाच्या नगरसेवकांचे बहुमत असणार आहे. त्यामुळे त्यांना या समित्यांवरही वर्चस्व ठेवणे शक्य होणार आहे.नव्या रचनेत पूर्वीच्या तीन क्षेत्रीय कार्यालयांच्या नावात बदल झाला आहे. एक क्षेत्रीय कार्यालय रद्द झाले तर एक क्षेत्रीय कार्यालय नव्याने निर्माण करण्यात झाले आहे. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे नाव बदलले असून ते आता शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय असेल. टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालय यापुढे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय म्हणून ओळखले जाईल. सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय रद्द झाले असून, त्याऐवजी वानवडी हे स्वतंत्र क्षेत्रीय कार्यालय असेल. कोंढवा-येवलेवाडी हे नवीन क्षेत्रीय कार्यालय तयार करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दी अखेर निश्चित
By admin | Published: April 29, 2017 4:23 AM